हलगर्जीपणा करणारे दोन ग्रामसेवक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 01:50 AM2022-04-23T01:50:42+5:302022-04-23T01:51:02+5:30

कामकाजात हलगर्जीपणा करून ग्रामस्थांना सेवेपासून वंचित ठेवल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांनी कोटंबी व कोमलवाडी येथील ग्रामपंचायतीच्या दोन्ही ग्रामसेवकांना सेवेतून निलंबित केले आहे. या कारवाईमुळे ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे.

Two Gram Sevaks suspended for negligence | हलगर्जीपणा करणारे दोन ग्रामसेवक निलंबित

हलगर्जीपणा करणारे दोन ग्रामसेवक निलंबित

Next
ठळक मुद्देसीईओंची कारवाई : ग्रामसेवकांचे धाबे दणाणले

नाशिक : कामकाजात हलगर्जीपणा करून ग्रामस्थांना सेवेपासून वंचित ठेवल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांनी कोटंबी व कोमलवाडी येथील ग्रामपंचायतीच्या दोन्ही ग्रामसेवकांना सेवेतून निलंबित केले आहे. या कारवाईमुळे ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोटंबी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पांडुरंग जाणू खरपडे यांच्याविरुद्ध कार्यालयीन कामकाजाबाबत ग्रामस्थांनी लेखी तक्रार अर्ज सादर केलेले होते. त्यानुसार प्रशासक आर. आर. बोडके यांनी ३ नोव्हेंबर व १२ जानेवारी रोजी भेट दिली असता खरपडे हे गैरहजर असल्याचे आढळून आले. तसेच खरपडे वारंवार अनधिकृतपणे गैरहजर असल्यामुळे ग्रामस्थांना शासकीय दाखले वेळेत न मिळणे, आदिवासी योजनांपासून गावास वंचित ठेवणे, ग्रामसभा न घेणे, पाणी शुद्धीकरणासाठी टीसीएल पावडर संपल्यानंतर नवीन साठा उपलब्ध करून न देणे, गावांत ३ विहिरी असून त्यापैकी कोटंबी येथील दोन विहिरीवर विद्युत कनेक्शन नियमित करण्यासाठी कोटेशन भरणेबाबत वारंवार सूचना देऊनही त्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बोरपाडा व बेहेडपाणी येथील ग्रामस्थांना विहिरीतून पाणी ओढून न्यावे लागत आहे. घरपट्टी, पाणीपट्टी वसुली न करणे, पंधराव्या वित्त आयोगाची रक्कम खर्च न करणे आदी दोषारोप ठेवण्यात आले आहेत. तसेच राजेंद्र भाऊराव निकम हे ग्रामपंचायत कोमलवाडी ता. सिन्नर येथे कार्यरत असून गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांनी विकासकामांचा आढावा घेण्यासाठी ग्रामपंचायतीस भेट दिली असता निकम हे अनधिकृतपणे गैरहजर होते. त्यामुळे निकम यांना कारणे दाखवा नोटीस दिली असता समाधानकारक लेखी खुलासा सादर केलेला नाही. निकम हे गैरहजर असल्याने तसेच ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणी केली असता ग्रामपंचायतीकडील नोंदवह्या अपूर्ण असल्याचे आढळले आहे. निकम यांच्या कामकाजाबाबत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी तक्रार केली असून त्यांचे कामकाज असमाधानकारक असल्यामुळे त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या विकासकामावर व प्रशासनावर होत आहे. त्यामुळे त्यांची अन्यत्र बदली करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांना निलंबित करण्यात आले आहे. दोन्ही ग्रामसेवकांना त्यांच्या कार्यालयीन कामकाजात सुधारणा व्हावी व गावांचा विकास करावा याबाबत संधी देऊनही त्यात सुधारणा न झाल्याने शेवटचा पर्याय म्हणून त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) रवींद्र परदेशी यांनी दिली.

Web Title: Two Gram Sevaks suspended for negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.