दोघा आजी-माजी नगरसेवकांना फटका
By admin | Published: February 6, 2017 12:17 AM2017-02-06T00:17:00+5:302017-02-06T00:17:16+5:30
सिडको विभाग : एबी फॉर्म गोंधळ; अपक्ष म्हणून लढावे लागणार
सिडको : प्रभाग क्रमांक २८ व २९ मध्ये शिवसेनेच्या वतीने आठ जागांसाठी सुमारे १५ एबी फॉर्म दिल्याने मोठा गोंधळ झाला होता. ज्या उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अगोदर सादर केला आहे, त्या उमेदवारांना शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळे या प्रभागांतून दोघा विद्यमान नगरसेवकांसह दोघा माजी नगरसेवकांना आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. प्रभाग क्रमांक २८ मध्ये तिघे विद्यमान नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, शीतल संजय भामरे, सुवर्णा दीपक मटाले व युवासेनेचे पदाधिकारी दीपक दातीर यांनी पक्षाचे एबी फॉर्म दिले होते, तर याच प्रभागातून विद्यमान नगरसेवक माणिक सोनवणे, रेणुका शरद गायधनी, सोनाली अजित काकडे यांनादेखील एबी फॉर्म दिले होते. तसेच प्रभाग क्रमांक २९ मध्ये विद्यमान नगरसेवक अॅड. अरविंद शेळके, रत्नमाला राणे, माजी नगरसेवक सुमन वामन सोनवणे, सतीश खैरनार यांना पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिले होते, तर याच प्रभागातून विद्यमान नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर,अतुल डेअरीचे संचालक भूषण देवरे, सुमन सोनवणे व माधुरी खैरनार यांनीही पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म लावून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याबाबत प्रभाग २८ मधून डी. जी. सूर्यवंशी, शीतल संजय भामरे, सुवर्णा दीपक मटाले व दीपक दातीर हे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र जाधव यांनी घोषित केले, तर रविवारी प्रभाग २९ चा निकाल देण्यात आला. यात दीपक बडगुजर, भूषण देवरे, रत्नमाला राणे, सुमन सोनवणे यांना निवडणूक निर्णय अधिकारी एन. डी. करे यांनी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर केले. यामुळे मनसेतून सेनेत गेलेले नगरसेवक अरविंद शेळके, सेनेचे स्वीकृत नगरसेवक माणिक सोनवणे तसेच सतीश खैरनार व माधुरी खैरनार या माजी नगरसेवकांना आता अपक्ष उमेदवारी करावी लागणार आहे. (वार्ताहर)