आजीसह दोन नातवंडांचा बुडून मृत्यू खिराड धरण : घागबारी गावावर शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:06 AM2018-03-09T00:06:54+5:302018-03-09T00:06:54+5:30
सुरगाणा : दिंडोरी, कळवण व सुरगाणा तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या घागबारीजवळील खिराड धरणात बुडून आजीसह दोन नातवंडांचा बुडून मृत्यू झाला.
सुरगाणा : दिंडोरी, कळवण व सुरगाणा तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या घागबारीजवळील खिराड धरणात बुडून आजीसह दोन नातवंडांचा बुडून मृत्यू झाला. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. घागबारी जिल्हा परिषद शाळेत पाचवीत शिकणारा योगेश रामचंद्र गायकवाड (११) व तिसरीत शिकणारी मोनिका रामचंद्र गायकवाड (९) सोमवारी (दि. ५) शाळा सुटल्यानंतर दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास आजी मांगीबाई लक्ष्मण गायकवाड (५३) जवळच असलेल्या धरणाजवळ कपडे धुण्यासाठी सोबत घेऊन गेल्या. धरणावर आजी कपडे धुवत असताना ही दोन्ही भावंडे पाण्यात डुबक्या मारून खेळत होती. दरम्यान, मोनिकाचा पाय घसरल्याने ती खोल पाण्यात बुडू लागली. योगेशच्या हे लक्षात येताच, बहिणीला वाचविण्यासाठी तोही खोल पाण्यात गेला. बहीण घाबरल्याने तिने भावाला घट्ट मिठी मारली. दोन्ही भावंडे पाण्यात बुडत असल्याचे पाहताच आजी मांगीबाई हिने दोघांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली.
दोघा भावंडांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी आजीलाही घट्ट मिठी मारल्याने आजीही पाण्यात बुडू लागली. दरम्यान, आजीचा नातू युवराज गावित (६) (मुलीचा मुलगा) याने ही घटना पाहून आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. युवराज धरणाच्या काठावर खेळत होता म्हणून तो वाचला. आजूबाजूला असलेले शेतात काम करणारे गावकरी मदतीला धावून आले; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या तिघा मायलेकरांचा धरणात बुडून दुर्दैवी अंत झाला होता. या घटनेने शोककळा पसरली आहे.