आघारला दोन गटात दंगल; १८ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 05:17 PM2018-09-10T17:17:57+5:302018-09-10T17:18:18+5:30

मालेगाव तालुक्यातील आघार बु।। व ढवळेश्वर येथे राजकीय नेत्याचे फलक फाडल्याच्या कारणावरुन रविवारी रात्री दोन गटात हाणामारी, दगडफेक व किरकोळ जाळपोळीचा प्रकार घडला. दंगलीत सहा घरांसह एका दुचाकीचे नुकसान झाले तर पाच जण जखमी झाले. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीसांनी ३८ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला असून पोलीसांनी सोमवारी दुपारपर्यंत १८ जणांना अटक केली. दरम्यान, सोमवारी गावात शांतता प्रस्थापित झाली असून पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

 Two groups clash; 18 people arrested | आघारला दोन गटात दंगल; १८ जणांना अटक

आघारला दोन गटात दंगल; १८ जणांना अटक

Next

रक्षाबंधनापासून आघार बु।। व ढवळेश्वर येथे दोन गटात धुसफूस सुरू होती. रविवारी पोळा सणाच्या दिवशी सायंकाळी बसस्थानक परिसरातील एका हॉटेलजवळ लावण्यात आलेल्या राजकीय नेत्याचे फलक फाडल्याने गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. फलक फाडण्याच्या घटनेवरुन दोन गटात मारहाण, दगडफेक व सुमारे पाच ते सहा घरांच्या काचा, खिडक्या फोडण्यात आल्या. तसेच किरकोळ जाळपोळीची घटना घडली. तसेच एका दुचाकीचेही नुकसान करण्यात आले. या दंगलीत पाच जण जखमी झाले. या घटनेची माहिती रविवारी रात्री अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे व वडनेर खाकुर्डीच्या पोलीसांनी जमावाला शांत केले. याप्रकरणी पोलीसांनी ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यामध्ये २२ जणांविरुद्ध अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी सोमवार दुपारपर्यंत पोपट संतोष निकम, शिवाजी जयराम सावकार, भाऊसाहेब रौंदळ, रविंद्र काशिनाथ पवार, स्वप्नील नारायण हिरे, रामदास देवा हिरे, जयदेव गोविंद हिरे, दीपक सावंत, स्वप्नील हिरे, आनंदा मोतीराम अहिरे, देवेंद्र दाणी, नानाजी दादाजी अहिरे, दादासाहेब नथु अहिरे, संजय सुकदेव गायकवाड, दीपक उत्तम गरुड, दीपक दादाजी अहिरे, पन्नालाल बाबुलाल पगारे, रविंद्र राजाराम पगारे आदि १८ जणांना अटक केली. दरम्यान सोमवारी जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आघार बु।। ला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तर तहसिलदार ज्योती देवरे, पोलीस उपअधीक्षक शिंदे यांनी दिवसभर गावातील नागरिकांची भेट घेऊन वाद मिटविला. पोलिस व महसूल प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.

Web Title:  Two groups clash; 18 people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.