मातोरीत दोन घरे आगीत भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:30 PM2020-05-07T17:30:20+5:302020-05-07T17:30:20+5:30
नाशिक : गावात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कोळीवाड्यातील दोन घरे भस्मसात झाली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले सिलिंडर गरम झाले; मात्र तत्काळ सिलिंडर ...
नाशिक : गावात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कोळीवाड्यातील दोन घरे भस्मसात झाली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले सिलिंडर गरम झाले; मात्र तत्काळ सिलिंडर आगीतून बाहेर काढण्यात आल्याने संभाव्य स्फोट टळला, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या दुर्घटनेत कुठल्याहीप्रकारची जीवीतहानी झालेली नाही.
मातोरी गावात गुरु वारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास योगेश भडीगे यांच्या घरात विजेच्या वायरने अचानक पेट घेतल्याने घरातील विद्युत उपकरणांसह संसार पूर्ण जळून खाक झाला तर शेजारील खंडू भडीगे यांच्या घराच्यादिशेनही आग पसरल्याने त्यांचेही घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यावेळी कुटुंबातील महिला वर्गाकडून नेहमीप्रमाणे सकाळचा स्वयंपाक सुरू होता. अचानकपणे खोलीतून धूराचे लोट उठत असल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी घराबाहेर धाव घेतली. क्षणार्धात आगीने रौद्रावतार धारण केल्याने घरातील गादी व इतर कपड्यांनी पेट घेतला. यावेळी गावकऱ्यांनी जमेल त्या बाजूने पाणी फेकून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला; मात्र आग आटोक्यात येत नव्हती. अखेर स्थानिकांच्या मदतीने घरावरील काही कौल काढून घेत आतमध्ये भडकलेल्या ज्वालांवर पाण्याचा मारा करून आग विझविण्यास गावकऱ्यांना विशेषत: तरुणांना यश आले. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील रमेश पिंगळे तलाठी कोकाटे यांना कळवताच त्यांनी जागेवर येत पंचनामा केला तसेच आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याने या कुटुंबियांची राहण्याची सोय समाज मंदिरात करावी अशी मागणी बाळू चारस्कर यांनी ग्रामपंचायतकडे केली असता ग्रामसेवक सुनील चौधरी यांनी या कुटुंबास किराणा भरून देत त्यांच्या राहण्याची सोय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात केली.
मिक्सर ठरला आगीचा स्त्रोत
घरातील मिक्सर ज्या विद्युत बोर्डात लावण्यात आला होता. त्या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन आग भडकली. मिक्सरचा विद्युतपुरवठा यावेळी सुरूच होता, असेही प्रथमदर्शनी समोर आले आहे. या भडकलेल्या आगीत सिलिंडरचा स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.