फुलेनगर येथे अडीच लाखाचा ऐवज लंपास
By admin | Published: February 1, 2017 11:01 PM2017-02-01T23:01:04+5:302017-02-01T23:01:18+5:30
सिन्नर : सुमारे आठ तोळे सोन्यांच्या दागिन्यांची चोरी
सिन्नर : तालुक्यातील फुलेनगर येथील पठाडे वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत अडीच लाख रुपये किमतीचे सुमारे आठ तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या घटनेमुळे वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
वावीपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर फुलेनगर गावाच्या पुढे थोरात वस्तीजवळ भाऊसाहेब रभाजी पठाडे यांचा बंगला आहे. तीन भावडांचे कुटुंब या बंगल्यात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहाते आईसमवेत राहते. तळ मजल्यावरील आई रखमाबाई यांच्या खोलीत कुटुंबातील सर्व सुनांचे सोन्या-चांदीचे दागिने लोखंडी पेटीत होते. मंगळवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पठाडे यांच्या तळ मजल्यावरील मुख्य दरवाजाचे हॅण्डड्रॉप तोडून आत प्रवेश केला. रखमाबाई पठाडे यांच्या खोलीत ठेवलेली लोखंडी पेटी व सुटकेस चोरट्यांनी बाहेर नेली. त्यातील प्रत्येकी एक तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, प्रत्येकी एक तोळे वजनाचे तीन सोन्याचे लॉकेट, दीड तोळे वजनाची सोन्याची पोत, सोन्याची नथ, दोन चांदीच्या तोळबंद्या असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
भाऊसाहेब पठाडे यांना जाग आल्यानंतर त्यांनी पुन्हा घरात एक चोरटा आत येताना पाहिल्यानंतर आरडाओरडा केला. कुटुंबातील सर्व सदस्य जागे झाल्यानंतर चोरट्यांनी पळ काढला. पठाडे यांनी तातडीने परिसरातील नागरिकांना फोन करून चोरटे आल्याची माहिती दिली. वावी पोलीस ठाण्यातील हवालदार राजेंद्र केदारे, हनुमंत कांबळे, रवि जाधव, एस.एस. उगले, नितीन जगताप यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेकडो ग्रामस्थ रात्री २ वाजेच्या सुमारास पठाडे यांच्या वस्तीवर जमा झाले. पोलीस व ग्रामस्थांनी परिसर पिंजून काढला मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.
निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे, वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रणजीत आंधळे यांनी सकाळी घटनास्थळी जाऊन तपासकामी मार्गदर्शन केले. घटनास्थळी श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानाने मक्याच्या शेतापर्यंत माग काढला.
याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र देवरे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)