आंदोलन करणाऱ्या दोनशे शेतकऱ्यांना अटक
By admin | Published: June 6, 2017 01:42 AM2017-06-06T01:42:04+5:302017-06-06T01:42:12+5:30
कळवण : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी दि. १ जूनपासून संपावर गेलेल्या कळवण शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेर सरकारविरोधात कळवण शहर व तालुका बंदचा आसूड उगारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी दि. १ जूनपासून संपावर गेलेल्या कळवण शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेर सरकारविरोधात कळवण शहर व तालुका बंदचा आसूड उगारला. यात व्यापारी व व्यावसायिकांनी सहभागी होत पाठिंबा दिला. कळवणसह अभोणा, कनाशी आदी आदिवासी भागात १०० टक्के बंद पाळण्यात आला. कळवण बसस्थानकाजवळ तब्बल दोन तास शेतकरी तळ ठोकून होते. यावेळी कळवण पोलिसांनी दोनशे-तीनशे राजकीय पक्ष पदाधिकारी व शेतकऱ्यांना अटक करु न नंतर सोडून दिले.
शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, मविप्र संचालक रवींद्र देवरे, जिल्हा युवक कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष शैलेश पवार, शेतकरी नेते शांताराम जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ, समता परिषदेचे कौतिक गांगुर्डे, प्रदेश उपाध्यक्ष माणिक देवरे आदींच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
कळवण शहरात मोटारसायकल रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले होते. बसस्थानकाजवळ शेतकरी नेते व शेतकरी बांधवांनी एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सदाभाऊ खोत व जयाजी सूर्यवंशी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजपा सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी बसस्थानकामधून एकही बस बाहेर पडू न देण्याचा इशारा देऊन दोन तास बसस्थानकाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संपाला पाच दिवस होत असताना राज्य सरकारने कर्जमाफीबाबत कोणतीच भूमिका न घेतल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. राज्यभरातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपल्या भावना प्रकट करीत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस खोटे गृन्हे नोंदवून आंदोलक शेतकऱ्यांवर कारवाई करीत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.
शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी, शेतकरी संप सुरूच राहणार असून, कोण्याही शेतकऱ्याने गुजरात राज्याकडे व शहराकडे भाजीपाला व शेतमाल पाठवू नये. दळवट येथे तीन दिवस मोठे आंदोलन होऊन पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यामुळे संप शेतकरी बांधवांनी हातात घेतला असल्याने संपाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. शेतकरी नेते शांताराम जाधव यांनी राज्य सरकारने आश्वासने दिली असली तरी ती मान्य नसल्याने हे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार
असल्याचे सांगून संप काळात शेतमालाची वाहतूक करणारे शेतकरी व त्यांची गावे जनतेला समजू द्या, त्यांना त्या पध्दतीने उत्तर देण्याचा इशारा देऊन संप यशस्वी करण्याची शपथ दिली. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर यांनी सरकारवर जोरदार टीका करून शेतकरी आता आक्र मक झाला आहे. शेतकरी संपात शिवसेना अग्रभागी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, नाशिक जिल्हा युवक कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष शैलेश पवार, समता
परिषदेचे कौतिक गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त करून शेतकरी संप यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
यावेळी देवराम कृष्णा पगार, शरद गुंजाळ, चंद्रकांत पवार, घनश्याम पवार, विलास रौंदळ, माणिक देवरे, पोपट पवार, दिलीप देशमुख, भिला पवार, रामा पाटील, योगेश खैरनार, गोरख खैरनार, मुरलीधर पगार, हरिभाऊ वाघ, विनोद खैरनार, नरेंद्र वाघ, नितीन पवार, सुनील गांगुर्डे, बापू जगताप, अमोल पगार, भाऊसाहेब पवार, दीपक पवार, साहेबराव निकम, शरद गांगुर्डे, राकेश गुंजाळ आदीसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.