दोनशे झोपड्या संबंधित अतिक्रमणधारकांनी काढून घ्याव्या - आदेश

By admin | Published: January 7, 2015 01:57 AM2015-01-07T01:57:29+5:302015-01-07T01:58:01+5:30

दोनशे झोपड्या संबंधित अतिक्रमणधारकांनी काढून घ्याव्या - आदेश

Two hundred huts should be taken away by the encroachers - order | दोनशे झोपड्या संबंधित अतिक्रमणधारकांनी काढून घ्याव्या - आदेश

दोनशे झोपड्या संबंधित अतिक्रमणधारकांनी काढून घ्याव्या - आदेश

Next

नाशिक : पंचवटी विभागातील सर्व्हे नंबर २५७ आणि २५९ वरील महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर म्हसोबावाडी नावाने अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या सुमारे दोनशे झोपड्या संबंधित अतिक्रमणधारकांनी चार आठवड्यात काढून घ्याव्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असून, न्यायालयाच्या आदेशानंतरही झोपड्या न हटल्यास महापालिका कारवाई करणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.
पंचवटी विभागातील म्हसरूळ शिवारातील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दक्षिण बाजूला असलेल्या सर्व्हे नंबर २५७ आणि २५९ वरील महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर नोव्हेंबर २०१४ मध्ये अचानकपणे सुमारे दीडशे ते दोनशे झोपड्या उभ्या राहिल्या. महापालिकेने त्याची तातडीने दखल घेत २० नोव्हेंबर २०१४ रोजी पोलीस बंदोबस्तात झोपड्या हटविल्या होत्या. त्यावेळी झोपडीधारकांनी विरोध करत पोलीस ठाण्याच्या आवारात धरणे धरली होती. दरम्यान, पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाची पाठ फिरताच झोपडीधारकांनी पुन्हा एकदा झोपड्या उभ्या केल्या होत्या. त्यानंतर बंदोबस्त पुरविण्यात पोलिसांचीही भूमिका संशयास्पद ठरली होती. पोलिसांकडून संबंधित अतिक्रमणधारकांशी चर्चा करून सामंजस्याने तोडगा काढण्याचा सल्लाही देण्यात आला होता. या चर्चेला स्थानिक नगरसेवक रंजना भानसी यांनी आक्षेप घेतला होता. त्यातच झोपडीधारकांचे नेतृत्व करणारे जी. जी. चव्हाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कारवाईला स्थगिती मिळविली होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होऊन न्यायालयाने येत्या चार आठवड्यांत संबंधित अतिक्रमणधारकांना झोपड्या स्वत:हून काढण्याचे आदेश दिल्याची माहिती अतिक्रमण उपआयुक्त रोहिदास बहिरम आणि स्थानिक नगरसेवक रंजना भानसी यांनी दिली. न्यायमूर्ती ओक यांनी हा आदेश दिला असून, अतिक्रमणधारकांकडून तसे प्रतिज्ञापत्रही लिहून घेण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. जे. शेखर यांनी काम पाहिले. तत्पूर्वी याचिकाकर्त्यांनी शासनाकडेही या प्रकरणी अपील केले असून, शासनाच्या निर्णयाकडेही महापालिकेचे लक्ष लागून आहे.

Web Title: Two hundred huts should be taken away by the encroachers - order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.