वृक्षांवर खिळे ठोकणाऱ्या तब्बल दोनशे जणांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:14 AM2021-01-21T04:14:34+5:302021-01-21T04:14:34+5:30
पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना शहरात तब्बल ४७ लाख वृक्ष असल्याची नोंद महापालिकेत झाली आहे. मात्र, दुसरीकडे अशा प्रकारची ...
पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना शहरात तब्बल ४७ लाख वृक्ष असल्याची नोंद महापालिकेत झाली आहे. मात्र, दुसरीकडे अशा प्रकारची झाडे टिकवून ठेवण्यात मात्र महापालिकेला अपयश येत आहे. शहरातील रस्त्याच्या कडेला किंवा अन्यत्रही झाडांवर खिळे ठेाकून जाहिराती करण्यात येत आहेत. बंदुकीपासून प्लंबर, मेस चालविणे आणि अन्य अनेक दुकानांच्या जाहिराती लावल्या जात आहेत. काही ठिकाणी दिशादर्शक फलकदेखील लवले जात आहेत. अशाप्रकारे खिळे ठेाकून जाहिराती केल्याने झाडांना इजा पोहोचत असून, कालांतराने झाड कमकुवत होऊन पडून जाते. त्याचबरोबर अशा जाहिरातींमुळे व्हिजन ब्रेक होते आणि वाहनचालकांना अडथळे येऊ शकतात. या सर्व बाबींचा विचार करून वृक्ष जैसे थे ठेवण्याची गरज असताना कुणीही यावे आणि विनापरवाना जाहिरात फलक ठाेकून जावे अशी स्थिती आहे.
‘लोकमत’ने गेल्या ६ जानेवारीस याबाबत वृत्त दिल्यानंतर महापालिकेचे उपआयुक्त (उद्यान) शिवाजी आमले यांनी सहाही विभागातील वृक्ष निरीक्षकांना संबंधित व्यवसायिकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर विभागात एकूण १९१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही मोहीम सुरूच असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करतानाच त्यांना पोलीस ठाण्यात बेालविण्यासाठी उद्यान विभागाने पाठपुरावा सुरू केला आहे.
इन्फो..
विभाग दाखल गुन्हे
नाशिक पश्चिम ५४
नाशिक पूर्व ४४
सातपूर ३१
सिडको ३०
नाशिकरोड २८
पंचवटी ११
इन्फो...
विविध कर विभाग निद्रिस्त
महापालिकेला व्यवसायिकांकडून जाहिरात कर मिळतो. मात्र, अशा छोट्या स्वरूपात पण बेकायदा जाहिरात करणाऱ्यांमुळे महापालिकेचा महसूल बुडतो. विविध कर वसुली विभाग संबंधितांकडून कर वसूल करू शकत असताना प्रत्यक्षात मात्र कर वसुली केली जात नाही.
--