चाळीसगाव फाट्याजवळ आयशरच्या धडकेत दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 01:26 AM2021-02-10T01:26:41+5:302021-02-10T01:27:11+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाट्यावर आयशरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत चाळीसगाव तालुक्यातील दोन जण जागीच ठार झाले. मृतातील एकाची ओळख पटली असून पंकज मुरलीधर पाटील (२८) रा. पिंपरी दौंड, ता. चाळीसगाव असे त्याचे नाव आहे. अन्य एका महिलेची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाट्यावर आयशरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत चाळीसगाव तालुक्यातील दोन जण जागीच ठार झाले. मृतातील एकाची ओळख पटली असून पंकज मुरलीधर पाटील (२८) रा. पिंपरी दौंड, ता. चाळीसगाव असे त्याचे नाव आहे. अन्य एका महिलेची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
दरम्यान, चंदनपुरी व सवंदगाव शिवारात अपघातांची मालिका वाढल्याने माजी आमदार आसीफ शेख यांनी समर्थकांसह महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केल्याने अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. मंगळवारी (दि.९) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मालेगावकडून चाळीसगावकडे दुचाकी (एमएच १९ बीए ४३५२) वर जाणाऱ्या पंकज पाटीलसह एका महिलेला आयशर (एमएच १८ बीबी ०११७) हिने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. पोलीसांनी आयशर चालक द्रोणागिरी गोसावी (रा. अवधान, जि. धुळे) याला ताब्यात घेतले आहे. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार कैलास गुजर, हवालदार अक्षय पाटील, सचिन दळवी करीत आहेत.
आयशरने दुचाकीला दिलेल्या धडकेनंतर अपघातातील अन्य एका मृत महिलेची रात्री उशिरापर्यंत ओळख पटू शकली नाही. या महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. दुचाकी क्रमांकावरून दाम्पत्य हे चाळीसगाव तालुक्यातील असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. चंदनपुरी, सवंदगाव, दरेगाव, म्हाळदे शिवारात अपघातांची मालिका वाढली आहे. यामुळे माजी आमदार शेख यांनी चाळीसगाव ते टेहरे फाट्यादरम्यान गतिरोधक बसवावेत. पथदिवे सुरू करावे. झेब्रा क्रॉसिंग तसेच पांढरे पट्टे मारावेत. सवंदगाव, दरेगाव, म्हाळदेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर हायमास्ट बसवावेत. रस्त्याचे सहापदरीकरण करावे आदी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात माजी नगरसेवक शकील जानीबेग, अज्जूभाई लसूनवाला, राजू इंजिनिअर, रफीक खजूरवाले आदिंसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे
या मार्गावर अपघातांच्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याने अपघात कमी होण्यासाठी विविध उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात या मागणीसाठी जमावाने सुमारे अर्धातास महामार्ग रोखून धरला होता. घटनेचे वृत्त कळताच तहसीलदार राजपूत, पोलीस उपअधीक्षक शिंदे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टोल कंपनी अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा करुन या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.