नाशिक-पुणे महामार्गावर कारच्या धडकेत दोघे ठार; सात जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:09 AM2018-07-03T01:09:32+5:302018-07-03T01:09:52+5:30
नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नरफाटा येथील निसर्ग लॉन्ससमोर रविवारी मध्यरात्री स्विफ्ट डिझायर कार व मारुती अल्टो कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन ठार व सात जण जखमी झाले आहेत. मयतांमध्ये डॉन बॉस्को शाळेचे शिक्षक व जेलरोड येथील युवकाचा समावेश आहे.
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नरफाटा येथील निसर्ग लॉन्ससमोर रविवारी मध्यरात्री स्विफ्ट डिझायर कार व मारुती अल्टो कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन ठार व सात जण जखमी झाले आहेत. मयतांमध्ये डॉन बॉस्को शाळेचे शिक्षक व जेलरोड येथील युवकाचा समावेश आहे. अंबड कामटवाडा संकेत हार्मोनी अपार्टमेंटमध्ये राहणारे डॉन बॉस्को शाळेतील शिक्षक पंकज लक्ष्मण जाधव, पत्नी वसुंधरा, मुलगा प्रज्वल, मुलगी अमोली हे चौघेजण मारुती अल्टो कार (एमएच १५, इपी ९०५) मधून नाशिकरोडच्या दिशेने रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास येत होते. यावेळी सिन्नरच्या दिशेने भरधाव वेगात जात असलेल्या स्विफ्ट डिझायर कारने (एमएच १५, ईई ४६३) निसर्ग लॉन्स समोर पुढे जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाºया मारुती अल्टो कारला जोरदार धडक दिली. दोन्ही वाहनांच्या या अपघातात मोठा आवाज होऊन दोन्ही गाड्या महामार्गाच्या आजूबाजूला पडल्या. यामध्ये दोन्ही गाड्यांची पुढील बाजू पूर्ण चक्काचूर झाली आहे.