सिन्नरजवळील अपघातात पुण्याचे दोघे ठार; चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 01:00 AM2017-07-20T01:00:43+5:302017-07-20T01:01:47+5:30
सिन्नरजवळील अपघातात पुण्याचे दोघे ठार; चार जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : नाशिक- पुणे महामार्गावर सिन्नर बायपासवर दुभाजकाला धडकून कार उलटल्याने आकुर्डी (पुणे) येथील दोघे युवक ठार झाले, तर अन्य चार जण जखमी झाले. बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.
दळवीनगर, आकुर्डी (पुणे) येथील सहा युवक टोयोटा कार (क्र. एमएच १४ एफसी ४३६८) ने पुण्याहून नाशिकडे जात असताना सदर अपघात झाला. गुरेवाडी फाट्याजवळ बायपासने कार वळविल्यानंतर पुढे दुभाजकावर कार आदळली. वेगामुळे कार उलटून सुमारे ८० फूट फरफटत गेली. या अपघातात रोहित किरण गंगावणे (२२) व दत्ता शहाजी गवळी (२१) रा. आकुर्डी (पुणे) हे जागीच ठार झाले. अपघातात विष्णू संजय शिघवत, सूरज प्रसाद गुप्ता, विकास अंकुश भिसे, अविनाश शिवाजी पांढारकर हे चौघे युवक जखमी झाले. सर्व जखमी आकुर्डी (पुणे) येथील आहेत. जखमींना नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ अधिक तपास करीत आहेत.