दोन कि.मी. पायी चालत महिलांचा हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 11:22 PM2021-02-26T23:22:09+5:302021-02-27T00:53:58+5:30
धार्डेदिगर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मोहबरी गावाला गेल्या तीन ते चार वर्षांपासून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी गावाबाहेरील शेतातील विहिरींवर वणवण फिरावे लागत आहे. अखेर सहनशीलतेचा बांध सुटल्याने या महिलांनी मोहबरीपासून दोन कि.मी पायी चालत धार्डेदिगर येथील ग्रामपंचायत मुख्यालयावर हंडा मोर्चा काढला.
पाळे खुर्द : धार्डेदिगर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मोहबरी गावाला गेल्या तीन ते चार वर्षांपासून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी गावाबाहेरील शेतातील विहिरींवर वणवण फिरावे लागत आहे. अखेर सहनशीलतेचा बांध सुटल्याने या महिलांनी मोहबरीपासून दोन कि.मी पायी चालत धार्डेदिगर येथील ग्रामपंचायत मुख्यालयावर हंडा मोर्चा काढला.
तालुक्यातील धार्डेदिगर ग्रामपंचायतीअंतर्गत धार्डेदिगर, पाडगन, पिंपळेखुर्द, मोहबरी ही चार महसुली गावे व पाटीलपाडा, टाकबारी ही दोन पाडे येतात. या भागात दरवर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो. मात्र पाणी अडविणे, जिरवणे तसेच पाणीपुरवठा योजनेची उद्भव विहीर पाण्याचा स्त्रोत असलेल्या योग्य ठिकाणी नसल्याने व पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने उन्हाळ्यात सर्वच गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यात विजेचाही खेळखंडोबा असल्याने महिलांना रात्री अपरात्री एक हंडा पाण्यासाठी पायपीट करावी लागते. मोहबरी परिसरात जंगल संपदा असल्याने येथे नेहमीच बिबट्यांचा वावर असतो. अशा भीतीच्या वातावरणात जीव धोक्यात घालून गावाबाहेरील शेतातील विहिरींवर भटकंती करीत पाणी आणावे लागते. पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी म्हणून अनेकवेळा ग्रामपंचायत, पंचायत समितीकडे निवेदन देऊन व समक्ष अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊनही आदिवासींच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. अखेर महिलांनी हंडा मोर्चा काढत निषेध केला.
इन्फो
इन्फो
पोलिसांवर दडपशाहीचा आरोप
मोर्चेकरी ग्रामपंचायतीवर धडकले पण ग्रामपंचायतीकडून अभोणा पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी पोलिसांनी कोविड व जमावबंदीचे कारण दाखवत आंदोलन मागे घ्या अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. त्यामुळे मोर्चेकऱ्यांना आंदोलन मागे घ्यावे लागले. आंदोलकांनी पोलिसांवर दडपशाहीचा आरोप केला आहे.
कोट....
मोहबारी, पिंपळेखुर्द या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी ५० हजार रुपये ग्रामपंचायत फंडातून खर्च केला गेला आहे. परंतु मोहबरी ग्रामस्थ वर्षानुवर्षे तहानलेले असताना त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी पैसा नाही. या बेकायदेशीर खर्चाची चौकशी करून संबंधितांकडून रक्कम वसूल करावी.
राजेंद्र भोये, ग्रामस्थ, मोहबारी
कोट....
मोहबारी येथे पाणीटंचाई आहे. येथे नवीन योजना प्रस्तावित केली आहे. त्यास मंजुरी मिळाली नाही. सद्या तात्पुरत्या स्वरूपात विंधन विहिरी घेऊन अथवा शेतकऱ्यांची विहीर अधिग्रहित करून गावाला पाणीपुरवठा केला जाईल.
- आर.एस. जाधव, ग्रामसेवक