प्रवाशाची दोन लाखांच्या दागिन्यांची बॅग परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 01:45 AM2022-02-16T01:45:02+5:302022-02-16T01:45:51+5:30
नाशिकरोड : शहरातील रिक्षाचालकांच्या नावाने नेहमीच नकारात्मक चर्चा केली जाते. मात्र काही रिक्षाचालक अपवादही असतात, सगळेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे नसतात, ...
नाशिकरोड : शहरातील रिक्षाचालकांच्या नावाने नेहमीच नकारात्मक चर्चा केली जाते. मात्र काही रिक्षाचालक अपवादही असतात, सगळेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे नसतात, याचा प्रत्यय नाशिकरोडला आला. रिक्षा प्रवासात दोन लाखांचे दागिने असलेली बॅग एक व्यक्ती विसरला. रिक्षाचालक पैसे घेऊन पुढे निघून गेला. काही अंतराने त्याने रिक्षा थांबविली असता रिक्षामध्ये प्रवाशाची बॅग असल्याचे लक्षात आले. त्याने ती बॅग थेट नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणून जमा केली. थोड्या वेळाने तो प्रवासी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पोहोचला असता तेथे पोलिसांनी त्या रिक्षाचालकाला बोलावून घेत त्याच्याच हस्ते मूळ मालकाला बॅग परत केली.
श्रीरामपूर येथील संदीप पगारे कुटुंबासह चेहेडी पंपिंग येथे सासुरवाडीला आले. चेहेडी नाका ते चेहेडी पंपिंग असा प्रवास त्यांनी रिक्षाने (एम. एच. १५ ईएच १२३१) केला. रिक्षातून उतरल्यावर ते दोन लाखांचे सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग ते रिक्षात विसरले. रिक्षाचालकाचा नंबर, चालकाचे नाव माहीत नव्हते. तरीही त्यांनी चेहेडी परिसरात रिक्षाचालकाचा शोध घेतला. रिक्षाचालक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पोहोचल्यावर त्याला रिक्षात प्रवासी बॅग विसरल्याचे लक्षात आले. संबंधित रिक्षाचालकाने इतर रिक्षाचालकांना याबाबत माहिती देत ‘येथे असे कोणी प्रवासी आल्यास नाशिकरोड पोलीस ठाण्यात बॅग जमा केली आहे, असे कळवा’ सांगून रिक्षाचालक शंकर बदाडे यांनी थेट नाशिकरोड पोलीस ठाणे गाठले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात संबंधित संदीप पगार तेथे आले असता इतर रिक्षाचालकांनी तुमची बॅग पोलीस ठाण्यात जमा केल्याचे सांगितले. बॅग मालक संदीप पगारे हे नाशिकरोड पोलीस ठाण्यात गेल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, दुय्यम पोलीस निरीक्षक गणेश न्याहादे यांनी शंकर बदाडे यांच्या हस्ते बॅग पगारे यांना परत केली. तसेच रिक्षाचालक शंकरचा पुष्पगुच्छ देत प्रामाणिकपणाचे कौतुक केले.