झापाला लागलेल्या आगीत दोन लाखांची रोकड खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 07:25 PM2020-11-04T19:25:49+5:302020-11-05T02:35:41+5:30
सटाणा : झापाला लागलेल्या भीषण आगीत आदिवासी शेतकरी कुटुंबाचे संसारोपयोगी वस्तू, धान्य तसेच दोन लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली. ही घटना बागलाण तालुक्यातील मोहोळागी येथे बुधवारी (दि.४) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

गजमल तुळशीराम सूर्यवंशी हे आपल्या कुटुंबीयांसमवेत शेतात काम करत असताना अचानक घराला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीत संसारोपयोगी वस्तू, धान्य तसेच रोकड जळून खाक झाली. आगीत सुमारे पावणेतीन लाखांचे नुकसान झाले. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. दरम्यान, तलाठी नागरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
बँकेने नोटा नाकारल्या....
घराचे बांधकाम करण्यासाठी सूर्यवंशी यांनी दोन लाख रुपये घरात ठेवले होते. मात्र या दुर्घटनेत दोन लाख रुपयांची रोकड अर्धवट जळाली. याबाबत महसूल यंत्रणेने तसा पंचनामादेखील केला आहे. या नोटा बदलण्यासाठी पीडित शेतकरी भारतीय स्टेट बँकेच्या सटाणा शाखेत गेले असता संबंधित अधिकाऱ्याने शेतकऱ्याला चक्क बाहेरचा रस्ता दाखवला. अधिकाऱ्यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे संताप व्यक्त केला जात असून, जळालेल्या नोटा तात्काळ बदलून द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे.
(०४ मोहोळी १, २)