दोन लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:12 AM2021-01-04T04:12:32+5:302021-01-04T04:12:32+5:30
नाशिक: मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीनंतर अतिवृृष्टीची मदत दिली जाईल, असे जाहीर करण्यात येऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही मदतीची रक्कम ...
नाशिक: मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीनंतर अतिवृृष्टीची मदत दिली जाईल, असे जाहीर करण्यात येऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही मदतीची रक्कम जमा होऊ शकलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकरी मदत मिळण्याची वाट पाहात आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ३ लाख ६६ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ १ लाख ६२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरच अतिवृष्टीची मदत जमा झाली आहे.
गेल्या ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. पावसाचा तडाखा, तसेच शेतात पाणी साठल्यामुळे कांदा, मका, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील पिके, तसेच काढून ठेवण्यात आलेली पिकेही वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरले नाही. भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा प्रशासन तसेच कृषी विभागाने अतिवृष्टीचे पंचनामे करण्यात आले. त्यानुसार, हेक्टरी दहा हजार व फळबागांना २५ हजार मदत जाहीर करत, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र, सर्वच शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३ लाख ६६ हजार ८३० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यासाठी पंचनाम्यानंतर जिल्हा प्रशसानाने नुकसान भरपाईसाठी शासनाकडे २४२ कोटींची मदतीचा प्रस्ताव पाठविला होता. दिवाळीनंतर त्यापैकी ११० कोटींची मदत जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. यापैकी एक लाख ६२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत जमा करण्यात आली. आता या घटनेला एक महिना होऊन गेला आहे. उर्वरित १३२ कोटींची मदत मिळणे बाकी आहे. दोन लाख चार हजार शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
--इन्फो--
लवकरच मदत शक्य
शासनाकडून अजूनही मदतीची उर्वरित रक्कम येणे बाकी असले, तरी राज्यावरील आर्थिक संकट लक्षात घेता, मदत कधी मिळू शकेल, याबाबत स्पष्टता नाही. मात्र, शेतकऱ्यांना मदत करणे प्राधान्यावर असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर रक्कम जमा हेाण्याचीही शक्यता आहे.