सुरगाणा तालुक्यात दोन लाखांचे विदेशी मद्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 01:01 AM2017-09-16T01:01:59+5:302017-09-16T01:02:04+5:30
सुरगाणा तालुक्यातील चिकारपाडा (कुकुडणे) येथील एका घरात राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने छापा टाकून दोन लाख रुपयांचा परराज्यातील विदेशी मद्यासाठी जप्त केला आहे़ या प्रकरणी संशयित महेश शांताराम भोये (रा़ देशमुखनगर, कुकुडणे, ता़ सुरगाणा, जि़ नाशिक) यास अटक करण्यात आली असून, गणेश परसू महाला हा फरार झाला आहे़
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील चिकारपाडा (कुकुडणे) येथील एका घरात राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने छापा टाकून दोन लाख रुपयांचा परराज्यातील विदेशी मद्यासाठी जप्त केला आहे़ या प्रकरणी संशयित महेश शांताराम भोये (रा़ देशमुखनगर, कुकुडणे, ता़ सुरगाणा, जि़ नाशिक) यास अटक करण्यात आली असून, गणेश परसू महाला हा फरार झाला आहे़ चिकरपाडा येथील एका घरात विदेशी मद्यसाठा ठेवण्यात आल्याची माहिती कळवण विभाग आणि विभागीय भरारी पथकास मिळाली होती. त्यानुसार विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक सी. बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने प्रताप सदू भोये यांच्या राहत्या घरातील पडवीत गुरुवारी (दि़१४) सायंकाळी छापा टाकला़ या तपासणीत दमन राज्यात विक्रीसाठी उपलब्ध असलेला दोन लाख सात हजार ७८० रुपयांचा मद्यसाठा आढळून आला.
दुय्यम निरीक्षक व्ही. एम. माळी, योगेश सावखेडकर, आर. आर. धनवटे, जवान कैलास कसबे, गणेश शेवगे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके, महिला जवान सोनाली चंद्रमोरे, वंदना देवरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
दमननिर्मित मद्यसाठा
विभागीय भरारी पथकाने इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की (१८० मिली) चे १६ बॉक्स, जॉन मार्टिन प्रिमियम व्हिस्की (१८० मिली) चे १० बॉक्स, हायवर्ड बिअर (५०० मिली)चे १६ बॉक्स, किंगफिशर स्ट्राँग प्रिमियम बिअर (६५० मिली) ३ बॉक्स असा दोन लाख ७ हजार ७८० रुपयांचा दमननिर्मित मद्यसाठा जप्त केला आहे़