दोन लाखांचे दागिने मिळाले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:15 AM2018-09-19T00:15:46+5:302018-09-19T00:16:16+5:30
गंजमाळ ते महामार्ग बसस्थानक या प्रवासात रिक्षात विसरलेली बॅग व त्यातील दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ८४ वर्षीय वृद्धेला परत मिळाले आहेत़
नाशिक : गंजमाळ ते महामार्ग बसस्थानक या प्रवासात रिक्षात विसरलेली बॅग व त्यातील दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ८४ वर्षीय वृद्धेला परत मिळाले आहेत़ मुंबई नाका पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या रिक्षाचालकाचा शोध घेतला तर रिक्षाचालकानेही ही बॅग सांभाळून ठेवलेली होती़
गंजमाळ येथील सुमतीलाल अमृतलाल शहा (८४) या २ सप्टेंबरला पहाटे सहा वाजेच्या सुमारास गंजमाळ येथून महामार्ग बसस्थानकावर रिक्षाने गेल्या होत्या़ त्या आपली बॅग या रिक्षामध्येच विसरल्या होत्या, विशेष म्हणजे या बॅगमध्ये सोन्याच्या साडेसहा तोळे वजनाच्या एक लाख ९२ हजार रुपयांच्या सहा बांगड्या व वस्तू होत्या़ यासंदर्भात त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कारंजे यांना माहिती दिली़
निरीक्षक कारंजे यांनी पोलीस उपनिरीक्षक एस. सी. सोनोने यांच्याकडे तपास दिला़ त्यांनी पोलीस हवालदार क्षीरसागर, एन. व्ही. लिलके, वाय. पी. गायकवाड, वाय. एस. लोंढे, एस. पी. गुंजाळ यांचे एक पथक नेमले. या पथकाने गंजमाळ ते महामार्ग बसस्थानक या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाची ओळख पटविली. रिक्षाच्या क्रमांकावरून अब्बास साबीर सय्यद या चालकाचा शोध घेतला.