धारगावला दाम्पत्यास बांधून दोन लाखांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 01:46 AM2018-10-29T01:46:51+5:302018-10-29T01:47:10+5:30
घरातील मागील बाजूस असलेले शटर वाकवून चौघा दरोडेखोरांनी दाम्पत्यास बांधून घरातील रोख रकमेसह दागिने असा दोन लाख २ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना धारगाव घोटी (ता. इगतपुरी) येथे रविवारी पहाटे उघड झाली. घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : घरातील मागील बाजूस असलेले शटर वाकवून चौघा दरोडेखोरांनी दाम्पत्यास बांधून घरातील रोख रकमेसह दागिने असा दोन लाख २ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना धारगाव घोटी (ता. इगतपुरी) येथे रविवारी पहाटे उघड झाली. घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारगाव घोटी येथील ज्ञानेश्वर (गणेश) कचरू नवाटे यांचे घरालगतच हॉटेल आहे. ते पत्नी व तीन मुलींसमवेत राहतात. मध्यरात्री ३ ते ३.३० च्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील चौघा दरोडेखोरांनी हॉटेलच्या मागील बाजूस असलेले शटर टॉमीने वाकवून आत प्रवेश केला. ज्ञानेश्वर नवाटे यांना कोणीतरी आल्याची चाहूल लागताच चौघांनी त्यांना पकडत प्रतिकार करण्याच्या आत दोराने बांधले. त्यांच्या मदतीला आलेल्या पत्नी सरला यांनाही या चौघांनी बांधून ठेवले व नवाटे यांच्या तीन मुली पायल, माऊली, पिंकी या समोर असताना या टाळक्याने दमदाटी करीत कपाटातील सोन्याचे मंगळसुत्र, चैन, अंगठी, झुबे असे सुमारे ८० हजाराचे दागीने व रोख एक लाख वीस हजार असा एकूण दोन लाख दोन हजाराचा ऐवज घेवून पलायन केले.
या घटनेनंतर गावात खळबळ उडाली, घोटी पोलिसांना या बाबत माहिती देण्यात आल्यानंतर पोलिस उप निरीक्षक विलास घिसाडी व त्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. या प्रकरणी ज्ञानेश्वर नवाटे यांच्या तक्रारीनंतर घोटी पोलिस ठाण्यात १४५/१८ भा.द. वि. कलम ३९४, ४५७, ३४२, ४५२ (३४) अ मुंबई पोलिस अॅक्ट १३५ अन्वये गुन्हा नोंद केली असून पोलिस उप निरीक्षक घिसाडी हे पुढील तपास करीत आहेत.