दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:53 AM2019-03-12T00:53:50+5:302019-03-12T00:54:15+5:30
शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहनचोरीसह घरफोडीच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे.
नाशिक : शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहनचोरीसह घरफोडीच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे. चोरट्यांच्या टोळीकडून बंद घरांना लक्ष्य केले जात असल्याने नागरिकांना परगावी जाणे धोक्याचे वाटू लागले आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तीन घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख २ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून, अद्याप शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दुचाकी, चारचाकी चोरीपासून घरफोडीपर्यंतच्या सर्वच गुन्ह्यांसह हाणामारीच्या घटनाही नित्यनेमाने घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे. नवनियुक्त आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी नाशिककरांना गुन्हेगारीचा बीमोड करण्याचा विश्वास दिला आहे. त्यांनी जमावबंदी आदेश लागू करून विविध पोलीस ठाणे हद्दीत कारवाईच्या सूचनाही केल्या आहेत. मात्र शहरातील पंचवटी, अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, सरकारवाडा, देवळाली कॅम्प, नाशिकरोड, भद्रकाली, गंगापूर, आडगाव अशा सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी, दुकानफोडी, वाहनचोरी, सोनसाखळी चोरी, मोबाइल चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांच्या नाकीनव आले आहे.
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी पाच दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला, तसेच तारवालानगर येथे एका बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ८३ हजारांचा ऐवज लंपास केला. दुसऱ्या घटनेत पाइपलाइनरोडवरील गणेशनगरमध्ये चोरट्यांनी व्यंकटेश मोडक यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून कपाटातील ३२ हजारांची रोकड हातोहात लांबविली. तिसऱ्या घटनेत अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी हेमांगी पाटील (२७, रा. पाटीलनगर) यांच्या बंद घराच्या पाठीमागील दरवाजाला खड्डा करून लावलेली कडी उघडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे सुमारे ८७ हजारांचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची फिर्याद त्यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. यामध्ये तीस ग्रॅमची सोन्याची पोत, ११ हजाराचे मंगळसूत्र, दहा ग्रॅमची कर्णफुले, वेल असे अकरा हजारांचे दागिने, पंधरा हजारांच्या चांदीच्या साखळ्या, तीन घड्याळे चोरट्यांनी लंपास केली आहेत.
नागरिक हवालदिल; चोरट्यांची टोळी सक्रिय
शहरातील विविध उपनगरांमध्ये चोरट्यांच्या वाढत्या उपद्रवाने नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोख पोलीस गस्तीची मागणी जोर धरू लागली आहे. गुन्हे शोध पथकानेही डोळ्यांत तेल घालून संशयित चोरट्यांचा माग काढण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. घरफोडी करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय घेतला जात आहे.