करंजगावला विहिरीत पडून दोन बिबट्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 01:41 AM2021-03-08T01:41:49+5:302021-03-08T01:43:27+5:30
निफाड तालुक्यातील करंजगाव येथील जुन्या विहिरीत पडून दोन बिबटे मृत झाल्याची घटना दि ७ मार्च रोजी उघडकीस आली आहे.
निफाड : तालुक्यातील करंजगाव येथील जुन्या विहिरीत पडून दोन बिबटे मृत झाल्याची घटना दि ७ मार्च रोजी उघडकीस आली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी बशीर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार करंजगाव येथे गट नंबर ५७६ मध्ये गोविंद भगूरे यांच्या मालकीच्या शेतीमध्ये झाडाझुडपांनी वेढलेली जुनी विहीर आहे. या विहीर परिसरात दुर्गंधी सुटल्याने भगूरे यांनी रविवारी दुपारी विहिरीत डोकावून पाहिले असता दोन वन्य प्राणी या विहिरीत कुजलेल्या अवस्थेत दिसले सदर खबर वन विभागाला मिळाल्यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बशीर शेख, वनपाल भगवान जाधव, वनरक्षक सुनील महाले ,वनसेवक भय्या शेख व वनमजूर आदींचे पथक घटनास्थळी पोहचले. सदर कुजलेले दोन्ही प्राणी विहिरीबाहेर काढले असता सदर मृत प्राणी बिबटे असल्याचे स्पष्ट झाले. सदर दोन्ही नर बिबटे अडीच ते तीन वर्षांचे होते.
दोघांच्या भांडणात विहीरीत पडल्याची शक्यता
या दोन बिबट्यांचे भांडण होऊन ते विहिरीत पडले असल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. दोन्ही बिबट्यांचे शव कुजले असल्याने जागेवर तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. रवींद्र चांदोरे यांनी या मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर या दोन्ही मृत बिबट्यांवर त्याच जागेवर अंत्यसंस्कार केले.