भक्ष्याच्या शोधात दोन बिबटे विहिरीत पडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 10:11 AM2019-03-08T10:11:44+5:302019-03-08T10:15:55+5:30
भक्ष्याच्या शोधात असताना दोन बिबटे विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी (8 मार्च) जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी बोरी येथे घडली आहे.
ओझर : भक्ष्याच्या शोधात असताना दोन बिबटे विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी (8 मार्च) जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी बोरी येथे घडली आहे. वन विभाग आणि माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रातील पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
जुन्नर तालुका बिबट्या प्रवण क्षेत्र आहे. तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहेत. बिबट्याला लपण्यासाठी हे मोक्याचे ठिकाण आहे. सध्या ऊसतोडणी सुरू असल्याने बिबट्याचा अधिवास कमी झाला आहे. शुक्रवारी रात्री भक्ष्याच्या शोधात असलेले दोन बिबटे बोरी येथील बबन विष्णु लेन्डे यांच्या विहिरित पडले. सकाळी लेंडे हे शेतात आल्यावर त्यांना बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. त्यांनी विहिरीत पाहिले असता दोन बिबटे विहिरीत पडले असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. बिबटे जिवंत असून त्यांना विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी माणिकडोह बिबटया निवारण केंद्राची रेस्क्यू टीम व वन परिक्षेत्र अधिकारी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. डॉ. अजय देशमुख वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, बी सी येळे यांची टीम व स्थानिक लोकांच्या मदतीने बिबटे विहिरीबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.