जैन श्रावक संघाकडून रुग्णांना दोन वेळचे जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:14 AM2021-04-25T04:14:01+5:302021-04-25T04:14:01+5:30
दरवर्षी भगवान महावीर जयंती निमित्त सिडको जैन श्रावक संघाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात, परंतु कोरोनामुळे सर्व धार्मिक ...
दरवर्षी भगवान महावीर जयंती निमित्त सिडको जैन श्रावक संघाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात, परंतु कोरोनामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम बंद ठेवण्यात आले असले, तरी धर्मार्थ कार्य मात्र सुरू आहे. भगवान महावीर यांची शिकवण डोळ्यासमोर ठेवत सिडको भागातील राणा प्रताप चौक, पवननगर, त्रिमूर्ती चौक आदी ठिकाणच्या जैन श्रावक संघ, समदिन ग्रुप, आनंद स्वभाग्य ग्रुप, सिडको महासंघाच्या वतीने कोरोना महामारी काळात ज्यांना गरज आहे, अशा रुग्णांना, तसेच त्यांच्या नातेवाइकांना अन्नदान करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. या निमित्त नाशिक शहरातील शासकीय हॉस्पिटल, तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांना, तसेच त्यांच्या नातेवाइकांना जेवणाची व्यवस्था होत नाही. विशेष करून बाहेर गावाहून आलेल्या रुग्ण, तसेच त्यांच्या नातेवाइकांना सकाळ व सायंकाळच्या वेळी डबे देण्याचे कार्य जैन श्रावक संघाच्या वतीने करण्यात येत आहे. या निमित्त दररोज ७०० ते ८०० डबे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दिले जात असल्याचे संघाच्या वतीने सांगण्यात आले.
कोट====
भगवान महावीर जयंती निमित्त धार्मिक कार्यक्रम, तसेच अन्नदान रक्तदान शिबिर वैद्यकीय उपचार आदी कार्यक्रम घेतले जातात, परंतु कोरोनामुळे हे सर्व कार्यक्रम बंद आहे. धार्मिक कार्यक्रम बंद असले, तरी कोरोना महामारीमुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्ण, तसेच त्यांच्या नातेवाइकांना दररोज सकाळ व सायंकाळ जेवणाचे डबे देण्याचे कार्य मात्र सुरू आहे.
- प्रकाशचंद्र नहाटा,
अध्यक्ष, जैन श्रावक संघ, सिडको