लष्करी जवानास पावणेदोन लाखांस गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:45 AM2019-11-16T00:45:17+5:302019-11-16T00:45:46+5:30
आॅनलाइन वाहन खरेदी करणे एका लष्करी जवानास चांगलेच महागात पडले असून, त्यास भामट्याने तब्बल पावणेदोन लाखास गंडविले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : आॅनलाइन वाहन खरेदी करणे एका लष्करी जवानास चांगलेच महागात पडले असून, त्यास भामट्याने तब्बल पावणेदोन लाखास गंडविले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली आर्टिलरी सेंटर येथील एका जवानाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जिह्यातील रहिवासी असलेल्या या जवानास कार खरेदी करावयाची असल्याने ते सोशल मीडिया आणि वाहन खरेदी-विक्रीच्या अॅपवर वाहनाचा शोध घेत होते. काही दिवसांपूर्वी ‘कारदेखो’ या मोबाइल अॅपवरील पुणे पासिंग (एमएच १२ एमआर ८०२५) ही वॅगनर कार त्यांना पसंत पडली. छायाचित्राच्या आधारे त्यांनी अॅपवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधला असता भामट्यांनी जवानाची माहिती मिळवित आपणही पुणे येथे लष्करात असल्याची बतावणी केली. त्यामुळे नाशिकच्या जवानाने त्याच्यावर विश्वास ठेवला. दोघांमध्ये वाहनाचा व्यवहार होऊन १ लाख ७१ हजार ९९८ रुपयांची रक्कम संशयिताने पेटीएम खात्यात आॅनलाइन ट्रान्सफर करण्यास सांगितली. त्यानुसार मंगळवारी (दि.१२) जवानाने रक्कम अदा केली. मात्र गेले तीन दिवस संशयिताने जवानास वाहन न सोपविल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
टेम्पोच्या धडकेत महिला ठार
भरधाव आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या महिलेचे उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून, याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्रमिकनगर येथील चंद्रमणीकुमार दिनेश प्रसाद हे पत्नी रजनीकांत (२६) हिच्यासोबत दुचाकीवर (एमएच ४१ एजे ६५२१) जात असताना हा अपघात झाला होता. गायत्री स्विटसमोर अशोकनगरकडून भरधाव येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीस पाठीमागून धडक दिली. या अपघातात दाम्पत्य जखमी झाले होते. त्यातील रजनीकांत या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.
सिडकोत महिलेस दोन लाखांस गंडा
कटलरी माल स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एकाने दुकानदार महिलेस दोन लाखांस गंडा घातल्याचा प्रकार सिडकोत घडला आहे. निहाल हुसेन सूर्यवंशी (रा. पाथर्डी फाटा) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी प्रमिला हरिभाऊ लोणारी (रा. सिंहस्थनगर) या महिलेने तक्रार दाखल केली आहे. लोणारी यांचे सिंहस्थनगर भागात दुकान आहे. गेल्या वर्षी संशयित दुकानात आला. यावेळी त्याने कटलरी माल कमी भावात आणून देतो अशी बतावणी करीत महिलेकडून दोन लाख रुपये घेतले. वर्ष उलटूनही माल अथवा पैसे न मिळाल्याने पोलिसात धाव घेऊन तक्रर दिली आहे.