कारचालकाचे अपहरण करणारे दोघे अल्पवयीन ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 08:15 PM2020-11-28T20:15:20+5:302020-11-28T20:15:36+5:30
मिळालेल्या मोबाईल नंबरचे लोकेशन काढून एका संशयितास कोपरगाव तर दुसऱ्याला संगमनेर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी येवला-मनमाड रोडवर बेवारस सोडून दिलेली व्हेरिटो कारदेखील ताब्यात घेतली आहे.
पंचवटी : नाशिकहून सिन्नरला जाण्यासाठी ओला कंपनीची चारचाकी बुक करून गाडी चालकाचे अपहरण करून गाडी सिन्नरला घेऊन न जाता शिर्डीला घेऊन जात चालकाचे हात दोरीने बांधून टाकात ३० हजार रुपयांची मागणी केली. चालकाने रक्कम देण्यास नकार दिल्याने दोघा अल्पवयीन लुटारुंनी चालकाला रस्त्यात सोडून चारचाकी पळवून नेणाऱ्या टोळीतील दोघांना पंचवटी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आधारे माहिती घेऊन कोपरगाव संगमनेर येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून व्हेरिटो कार जप्त केली आहे.
दोन दिवसांपूर्वी संशयितांनी सिन्नरला कंपनीत जाण्यासाठी ओला कंपनीची कार घेतली होती. संशयित मखमलाबाद रोडवर असलेल्या मंडलिक मळा येथून कारमध्ये बसले होते. त्यानंतर त्यांनी सिडको, उत्तमनगर येथे राहणाऱ्या चालक राहुल प्रदीप फेगडे यांना सिन्नरऐवजी गाडी शिर्डीकडे घेऊन जाण्यास सांगितले. दरम्यान, त्यांनी चालकास रस्त्यात मारहाण करून त्याच्या ताब्यातील दोन मोबाईल तसेच एटीएम कार्ड व चारचाकी क्रमांक (एमएच१५ इ ७८३७) घेऊन पोबारा केला होता. सदर घटनेनंतर चालक फेगडे यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार कथन करत तक्रार दिली होती. यावरुन घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी त्वरित गुन्हा दाखल केला आणि गुन्हे शोध पथकाला तपासचक्रे फिरविण्याचे आदेश दिले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, हवालदार मलंग गुंजाळ, दिलीप बोंबले, कल्पेश जाधव, घन:श्याम महाले यांच्या पथकाने संशयित आरोपी ज्या टोलनाक्यावरून गेले तेथिल माहिती घेत मिळालेल्या मोबाईल नंबरचे लोकेशन काढून एका संशयितास कोपरगाव तर दुसऱ्याला संगमनेर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी येवला-मनमाड रोडवर बेवारस सोडून दिलेली व्हेरिटो कारदेखील ताब्यात घेतली आहे. या गुन्ह्यातील आणखी दोघे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.