मालेगावमध्ये आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 11:25 PM2020-04-24T23:25:55+5:302020-04-24T23:41:01+5:30
नाशिक : मालेगावमध्ये कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. शुक्रवारी (दि.२४) मृतांच्या संख्येत आणखी दोघांची भर पडल्याने मालेगावातील मृतांचा आकडा तब्बल ११ वर पोहोचला आहे. दरम्यान, येवल्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शिवाय नाशिक शहरातही शुक्रवारी आणखी एक बाधित आढळून आल्यामुळे प्रशासन चांगलेच धास्तावले आहे.
नाशिक : मालेगावमध्ये कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. शुक्रवारी (दि.२४) मृतांच्या संख्येत आणखी दोघांची भर पडल्याने मालेगावातील मृतांचा आकडा तब्बल ११ वर पोहोचला आहे. दरम्यान, येवल्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शिवाय नाशिक शहरातही शुक्रवारी आणखी एक बाधित आढळून आल्यामुळे प्रशासन चांगलेच धास्तावले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. मुंबई-पुणे पाठोपाठ मालेगावदेखील हॉटस्पॉट ठरले असून, बाधितांची संख्या शंभरापुढे गेली आहे. शुक्रवारच्या अहवालानुसार मालेगावमध्ये आणखी कोरोनाबाधित आढळल्याने एकट्या मालेगावातील बाधितांची संख्या ११८ वर गेलेली आहे.
नाशकातही शुक्रवारी बाधित आढळून आला. हा बाधित मूळचा शहरातील नसून मानखुर्द येथून भंडारा येथे जात असताना त्यास पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले असल्याचे सांगण्यात येते.
-----------
जिल्ह्यात १३४ बाधित
जिल्ह्यात कोेरोनाचे संकट कायम आहे. शुक्रवारी उशिरापर्यंतच्या माहितीनुसार बाधितांची संख्या १३४ वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्याच्या ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येतील त्या भागातील सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवादेखील तत्काळ बंद करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे.
-----------
जिल्ह्यातील येवला येथेही कोरोनाने शिरकाव केला. शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार येवल्यात एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील मालेगाव, सिन्नर नंतर येवला तालुकाही कोरोनाच्या कक्षेत आल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
---------
अतिरिक्त कुमक
मालेगावी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्य विभागातील आणखी १४२ कर्मचाऱ्यांची कुमक रवाना करण्यात आली आहे. यापूर्वीही ४० आरोग्य अधिकारी देण्यात आले आहेत. त्यात भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांचा समावेश आहे. त्यांना तातडीने मालेगावी रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.