आणखी दोन राज्यमार्ग महापालिकेकडे हस्तांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:37 AM2017-10-26T00:37:43+5:302017-10-26T00:37:51+5:30
नाशिक : राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिका हद्दीतील नाशिक-पेठ या राज्यमार्गावरील ११.६०० कि.मी.चा रस्ता तसेच नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावरील आडगाव नाका ते मानूर जकात नाक्यापर्यंतचा ५.४०० कि.मी. रस्ता नाशिक महापालिकेकडे अवर्गीकृत (डिनोटिफाईड) म्हणजेच हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रस्ते हस्तांतरित करताना दुरुस्ती व देखभालीचा खर्च महापालिकेच्याच माथी मारला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील पाचशे मीटर अंतरावर असलेल्या मद्यविक्रीच्या दुकानांवर बंदी घातल्यानंतर राज्य व राष्टÑीय महामार्गाच्या हस्तांतरणाचा मुद्दा पेटला होता. सदर रस्ते हस्तांतरणाबाबत मद्यविक्रेत्यांची लॉबीच सक्रिय झाली होती.
आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
डहाणू-नाशिक-त्र्यंबक आणि नाशिक-दिंडोरी-वणी हे दोन राज्यमार्ग महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते, सन २००१-०२ मध्येच हस्तांतरित झाले असून, त्याची देखभाल-दुरुस्तीही महापालिकाच करत आहे. सदर मार्ग अवर्गीकृत (डिनोटिफाईड) करण्याचा संपूर्ण अधिकार हा राज्य शासनाचा आहे. या अवर्गीकृतकरणामुळे महापालिकेवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. मात्र, उर्वरित तीन राज्यमार्ग हस्तांतरित करताना शासनाकडे निधीचीही मागणी करणारा प्रस्ताव पाठविला जाईल, अशी भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली होती. आता सदर दोन्ही रस्ते महापालिकेकडे अवर्गीकृत झाल्याने आणि शासनाने त्याबाबतचे कसलेही दायित्व स्वीकारण्यास नकार दिल्याने आयुक्त नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून असणार आहे.
अभिलेखच उपलब्ध नाही
महापालिकेने शासनाला सहा रस्त्यांची माहिती पाठविली होती. त्यात शहरातून जाणारे पाचपैकी तीन राज्यमार्ग हे मनपाकडे हस्तांतरितच झाले नसल्याचे आणि त्यासंबंधीची कागदपत्रेही उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. नाशिक-पेठ राज्यमार्ग क्रमांक ३७ हा पेठनाका ते मनपा हद्दीपर्यंत ११.६०० कि.मी.चा आहे. सदर रस्ता मनपा हद्दीपर्यंत नाशिक महापालिकेकडे दुरुस्ती व देखभालीसाठी वर्ग करण्यात आलेला आहे, परंतु त्याबाबतचे कोणतेही ठराव व हस्तांतरणाबाबतचा शासननिर्णय अभिलेखात आढळून आलेला नाही. सदरच्या रस्त्याची महापालिकेमार्फत दुरुस्ती व देखभाल करण्यात येत आहे आणि महापालिकेच्या विकास योजना आराखड्यातही तो ३० मीटर रुंदीचा डी.पी. रस्ता म्हणून दर्शविलेला आहे.