खिडकीतून हळूच मोबाइल,पाकीट गायब करणारे दोघे अट्टल चोर अलगद अडकले नाशिक 'क्राईम ब्रँच'च्या सापळ्यात
By अझहर शेख | Published: June 1, 2023 05:34 PM2023-06-01T17:34:46+5:302023-06-01T17:38:02+5:30
पथकाने एकूण १६ मोबाइल दोघांच्या ताब्यातून हस्तगत केले आहेत.
नाशिक : घरांच्या उघड्या खिडक्यांमधून हात टाकून अलगदपणे मोबाइल लंपास करणाऱ्या दोघा सराईत चोरांना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने शिताफीने बेड्या ठोकल्या. त्यांची कसून चौकशी केली असता संशयितांनी मोबाइल चोरीची कबुली दिली. पथकाने एकूण १६ मोबाइल दोघांच्या ताब्यातून हस्तगत केले आहेत.
उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील जेल रोड येथील रहिवासी भाऊसाहेब आहेर (रा. सप्तश्रृंगीनगर) यांच्या राहत्या घरातून खिडकीमधून हात टाकून मोबाइल व सोळा हजारांची रोकड असलेले पाकीट असा १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकातील राहुल पालखेडे यांना गोपनीय माहिती मिळाली. चोरीचा माेबाइल विक्री करण्यासाठी दोघे संशयित कामटवाडे येथील एका गार्डनमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे हवालदार प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, विशाल काठे, प्रशांत मरकड, आदींच्या पथकाने सापळा रचला.
या ठिकाणी आलेले संशयित सराईत चोर विजय तुकाराम वाघमारे (४७, रा. दत्तनगर, चुंचाळे), सागर संजय गरूड (२४, रा. अंबड) यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून चार मोबाइल आढळून आले. पोलिसांनी दोघांची अधिक कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून १२ मोबाइल असे ९७ हजार रुपये किमतीचे १६ मोबाइल जप्त करण्यास पोलिसांना यश आले. उपनगर पोलिस ठाण्यातील चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, या दोघांकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.