साळसाणे येथील घरफोडी प्रकरणी दोन संशयितांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 06:24 PM2020-02-20T18:24:28+5:302020-02-20T18:25:23+5:30
चांदवड तालुक्यातील साळसाणे येथे दि. ३१ जानेवारी रोजी झालेल्या चोरी प्रकरणी नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशयितांना निफाड तालुक्यातील नैताळे येथून ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्यांना २२ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
चांदवड : तालुक्यातील साळसाणे येथे दि. ३१ जानेवारी रोजी झालेल्या चोरी प्रकरणी नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशयितांना निफाड तालुक्यातील नैताळे येथून ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्यांना २२ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
तालुक्यातील साळसाणे येथील विजय दामू ठाकरे यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी दि. ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री चोरी करुन दोन लाख दहा हजार रुपये रोख, साठ हजार रुपयाचे मंगळसूत्र , दहा हजार रुपयाच्या तोळबंद्या, २० हजार रुपयांचे सोन्याचे टॉप्स असा एकूण तीन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद विजय ठाकरे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली होती. पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंदे, अरुण पगारे, मंगेश गोसावी, सुशांत मार्कंड , हेमंत गिलबिले यांच्या पथकाने निफाड तालुक्यातील नैताळे येथे संशयित संदीप उर्फ संदेश संजय भोसले (२१) रा. कोळगाव ता. श्रीगोंदा जि.नगर, लंगड्या उर्फ गिल्या रमेश काळे (२४) रा.माहेरवाडी कोळगाव ता. श्रीगोंदा जि.नगर या दोघांना दि. २० फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. त्यांना चांदवड पोलीस स्टेशनला अटक करुन ठेवण्यात आले.
दरम्यान चांदवड जेलमध्ये संशयित लंगड्या उर्फ गिल्या रमेश काळे याने भिंतीवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या समजते. त्यांच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले.
या दोघांना चांदवड न्यायालयात न्या. एस.बी. वाळके यांच्या समोर उभे केले असता त्यांना दि. २२ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याबाबत अधिक तपास चांदवडचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय जाधव, राजेंद्र बिन्नर हे करीत आहेत.