दरोड्याच्या तयारीतील दोघा संशयिताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:51 PM2020-02-24T23:51:31+5:302020-02-25T00:20:55+5:30
सिन्नर - घोटी मार्गावर तालुक्यातील घोरवड गावाजवळ शनिवारी (दि. २२) रात्री ११.३० च्या सुमारास स्क्रॅप मटेरियल घेऊन जाणारा ट्रक रस्त्यात अडवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र,७ जणांच्या टोळीतील ५ जण फरार झाले आहेत.
सिन्नर : सिन्नर - घोटी मार्गावर तालुक्यातील घोरवड गावाजवळ शनिवारी (दि. २२) रात्री ११.३० च्या सुमारास स्क्रॅप मटेरियल घेऊन जाणारा ट्रक रस्त्यात अडवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र,७ जणांच्या टोळीतील ५ जण फरार झाले आहेत.
घोटीहून सिन्नरच्या दिशेने स्क्रॅप मटेरियल घेऊन एक ट्रक शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास जात होता. त्या दरम्यान साकूरफाटा येथून तीन मोटारसायकलवर प्रत्येकी तीन जण असे नऊ चोरट्यांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला. घोरवड गावाजवळ आल्यानंतर त्यातील एकाने रस्त्यात मोटारसायकल आडवी लावून ट्रकला थांबविले. ट्रकचालक व क्लीनरला खाली ओढत चोरट्यांनी शिवीगाळ करत लुटण्याचा प्रयत्न केला. ट्रकचालकाने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ लहानू हगवणे, दिलीप हगवणे, बाळू
हगवणे, हरिभाऊ हगवणे, किरण हगवणे, माधव हगवणे, रामदास हगवणे, सागर म्हसाळ, सोमनाथ गायकवाड, धनंजय माळी, सुखदेव लहामटे आदींनी धाव घेतली. त्यांनी संशियत चोरट्यांना पकडून ठेवले व ताबडतोब सिन्नर पोलिसांना माहिती दिली.
पोलीस हवालदार मधुकर खुळे, हरिश्चंद्र गोसावी, राहुल निरगुडे, सुशील शिंदे, विनायक आहेर आदींनी तात्काळ घटनास्थळी पोहचून संदीप देवराव कोकाटे (२०) व ज्ञानेश्वर काळू जळंदे (१९), दोघेही राहणार शेणवड, ता. इगतपुरी या संशियत चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यातील पाच जण मात्र फरार झाले. संशियत चोरट्यांकडून मोटारसायलसह एक तलवार व इतर हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
सिन्नर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्रीकांत गारूंगे, नवनाथ शिरोळे, पाठक अधिक तपास करीत आहेत.