जबरी लूट करुन व्यावसायिकाचा खून केल्याप्रकरणी दोघे संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:31 PM2019-01-16T13:31:14+5:302019-01-16T13:34:25+5:30
या दोन्ही घटनांचा तपास पुर्ण होत नाही तोच पुन्हा मंगळवारी (दि.१५) मकरसंक्रांतीच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाला टोळक्याने धारधार शस्त्राने हल्ला करीत ठार मारल्याची घटना घडली.
नाशिक : इंदिरानगर परिसरातील एका मॉलच्या व्यावसायिकाची जबरी लूट करुन सहा लाखाची रोकड लंपास करत हल्लेखोरंनी व्यावसायिकाला ठार मारल्याची घटना आठवडाभरापुर्वी घडली होती. या गुन्ह्यात फरार संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. स्वतंत्र पथके पोलिसांनी संशयितांचा माग काढण्यासाठी रवना केली होती. अखेर त्यात पोलिसांना यश आले असून दोघा संशयितांना पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतल्याचे समजते. या संशयितांची कसून चौकशी अद्याप सुरू असल्याने त्यांची नावे पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेली नाही; मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. दोघा संशयितांच्या मुसक्या पोलिसांना आवळण्यास यश आल्याचे त्यांनी सांगितले. हे दोघे संशयित पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलेनगर झोपडपट्टीमधील असल्याचे बोलले जात आहे.
इंदिरानगर येथील बापू बंगला परिसरात असलेल्या ‘सुपर ग्राहक बाजार’चे संचालक अविनाश महादू शिंदे (३५) यांच्यावर गेल्या मंगळवारी (दि.८) रात्री साडेदहा वाचेच्या सुमारास ते राहत असलेल्या शेजारील अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारावर अज्ञात दोघा हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने हल्ला चढविला होता. या हल्ल्या जबर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी त्यांच्या ताब्यातील सहा लाख रुपयांची रोकड असेलेली बॅग हिसकावून पळ काढला होता. नव्या वर्षाच्या प्रारंभी शहरात हा खूनाचा पहिला गुन्हा घडला. त्यापाठोपाठ बुधवारी (दि.९) दुपारच्या सुमारास कॉलेजरोडवरील एका व्यावसायिक अपार्टमेंटच्या छतावर पतीने पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या दोन्ही घटनांचा तपास पुर्ण होत नाही तोच पुन्हा मंगळवारी (दि.१५) मकरसंक्रांतीच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाला टोळक्याने धारधार शस्त्राने हल्ला करीत ठार मारल्याची घटना घडली. शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या आठवडाभरात घडलेल्या या खूनांच्या घटनांनी शहर हादरले असून शहरात कायदासुव्यवस्थेला गालबोट लागले आहे.