साउंड सिस्टीम चोरून घेऊन जाणाऱ्या दोघा चोरट्यांना मुद्देमालासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:14 AM2018-04-28T01:14:39+5:302018-04-28T01:14:39+5:30
एकलहरारोड कर्षण मशीन कारखाना येथील गोदावरी सभागृहाच्या खिडकीची काच फोडून एक लाख रुपये किमतीचे साउंड सिस्टीम चोरून घेऊन जाणाऱ्या दोघा युवकांना नाशिकरोड पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चोरलेला माल जप्त केला आहे.
नाशिकरोड : एकलहरारोड कर्षण मशीन कारखाना येथील गोदावरी सभागृहाच्या खिडकीची काच फोडून एक लाख रुपये किमतीचे साउंड सिस्टीम चोरून घेऊन जाणाऱ्या दोघा युवकांना नाशिकरोड पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चोरलेला माल जप्त केला आहे. कर्षण मशीन कारखाना येथील गोदावरी सभागृहाची पाठीमागील खिडकीची काच फोडून शनिवार १४ एप्रिल रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी सहा स्पिकर, दोन एम्प्लिफायर, एक लाइव्ह मिक्सिंग कन्सोल, चार एलइडी लाइट असा सुमारे ९५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी सुरक्षा ठेकेदार परमेश्वर कुंचबिहारी दुबे यांनी गुरुवारी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, दुय्यम पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, उत्तम दळवी, प्रकाश भालेराव, विशाल कुवर, समाधान वाजे, राजेंद्र जाधव यांनी संशयित रवि सुरेश पवार (वय २२ रा. दसक, जेलरोड) दीपक ऊर्फ सोनू गोरख मोरे (नय २०, रा. सिद्धार्थनगर, एकलहरा) यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला सर्व माल हस्तगत करण्यात आला आहे. दोघा संशयितांना शुक्रवारी नाशिकरोड न्यायालयासमोर हजर केले असता सोमवार (३० एप्रिल)पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.