बैल धुण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू
By admin | Published: September 2, 2016 01:25 AM2016-09-02T01:25:28+5:302016-09-02T01:26:03+5:30
बैल धुण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू
दिंडोरी/मनमाड : पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या दोघांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब आणि मनमाडनजिक सदर घटना घडल्या. दोघांच्या मृत्यूमुळे दोन्ही गावात पोळा सणावर शोककळा पसरली. प्रकाश मुळाणे (मडकीजांब) आणि योगेश काळे (मनमाड) अशी मृतांची नावे आहेत.
मडकीजांब येथे प्रकाश राजेंद्र मुळाणे हा वडिलांसोबत पाझर तलावावर बैल धुण्यासाठी गेला होता. वडील बैल धूत असताना पाठीमागे असलेला प्रकाश पाण्यात बुडाला. त्याचा ग्रामस्थांनी शोध घेतला मात्र तो सापडला नाही. दुसरी घटना मनमाड येथून जवळच असलेल्या पांझणदेव (ता. नांदगाव) येथील युवकाचा पोळ्याचे बैल धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेला असता बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या घटनेमुळे पांझणदेव गावावर शोककळा पसरली असून, येथील पोळा सणावर दु:खाचे सावट होते.
योगेश भगवान काळे (२४) हा युवक पोळ्याच्या सणासाठी महादेव मंदिर बंधाऱ्यावर बैल धुण्यासाठी गेला. बैल धुऊन झाल्यानंतर त्याने बैल बाहेर आणून झाडाला बांधले व तो अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला. यागेश पट्टीचा पोहणारा असून, गावातील अनेक जणांना त्याने पोहण्याचे प्रशिक्षण दिले असल्याचे सांगण्यात येते. मात्र पोहण्याच्या कलेत पारंगत असलेल्या योगेशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदरची घटना समजताच परिसरातील नागरिकांनी बंधाऱ्यावर धाव घेतली. बंधाऱ्याला अथांग पाणी असल्याने मृतदेह शोधण्यासाठी अडचणी येत होत्या. तब्बल अडीच तासाच्या प्रयत्नांनंतर योगेशचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मनमाड येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)