दोन दिवसांत दोन हजार नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 10:36 PM2020-04-12T22:36:18+5:302020-04-13T00:58:44+5:30
नाशिक : शहरात दोन संशयित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेने बाधितांच्या निवासस्थानाच्या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण सुरू केले असून, दोन दिवसांत दोन हजार ९०८ नागरिकांची माहिती घेऊन प्रसंगी तपासणी करण्यात आली आहे.
नाशिक : शहरात दोन संशयित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेने बाधितांच्या निवासस्थानाच्या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण सुरू केले असून, दोन दिवसांत दोन हजार ९०८ नागरिकांची माहिती घेऊन प्रसंगी तपासणी करण्यात आली आहे. यात एक संशयित रुग्ण आढळला असून त्याला उपचारासाठी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर दुसरीकडे बाधितांच्या संपर्कातील अत्यंत जोखमीच्या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
नाशिक शहरात या आधी एकच रुग्ण होता. त्याठिकाणी महापालिकेने तीन किमीचा परीघ सील केला आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या नागरिकांना १४ दिवस हा परिसर सोडता येणार नाही अशी स्थिती आहे. दरम्यान, महापालिकेने यानंतर आता अन्य दोन भागांत कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याठिकाणीदेखील अत्यंत काळजीपूर्वक आरोग्य हाताळणी सुरू केली आहे. महापालिकेच्या वतीने बाधित रुग्णांच्या घराच्या परिसरातील पाचशे मीटर अंतरावरील क्षेत्र सील करण्यात आले आहे. तीन ठिकाणच्या प्रतिबंधित क्षेत्रात मिळून सध्या ५५ वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आले आहे. दोन बाधित रुग्णांच्या निवासाच्या परीक्षेत्रात दहा हजार ५७५ लोकसंख्या आहे. त्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, त्यातील २ हजार ९०७ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या कोरोना बाधितांपैकी एकाच्या संपर्कातील पाच तर दुसऱ्या बाधिताच्या संपर्कात २१ व्यक्ती जोखमीच्या होत्या, तर त्यापेक्षा कमी जोखमीच्या १७ व्यक्ती असल्याने त्यांच्याबाबत महापालिकेतील चिंता लागून होती. त्यातील बाधिताच्या कुटुंबातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.