दोन हजार गृहनिर्माण संस्था धोक्यात
By Admin | Published: March 2, 2016 11:41 PM2016-03-02T23:41:25+5:302016-03-02T23:43:17+5:30
दोन हजार गृहनिर्माण संस्था धोक्यात
नाशिक : कागदोपत्री नोंदणी असलेल्या सहकारी संस्थांच्या नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही करणाऱ्या सहकार खात्याने आता चक्क गृहनिर्माण सहकारी संस्थांना लक्ष्य केले असून, शहरातील १९७७ गृहनिर्माण सहकारी संस्थांना लेखापरीक्षण केले नसल्याचे कारण देत नोेंदणी रद्द करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
यासंदर्भात तालुका उपनिबंधक फयाज मुलानी यांनी शहरातील १९७७ गृहनिर्माण सहकारी संस्थांची यादी जाहीर केली असून, त्यांना ११ मार्च २०१६ पूर्वी त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. मुळातच कोल्हापूर येथे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृहनिर्माण सहकारी संस्था वगळता कागदोपत्री असलेल्या अन्य सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याचे जाहीर केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच मागील जानेवारी महिन्यात गृहनिर्माण संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावून तत्काळ लेखापरीक्षण करण्याचे व न केल्यास नोेंदणी रद्द करण्याबाबतच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र नंतर शासन स्तरावरून तोंडी आदेशानुसार गृहनिर्माण सहकारी संस्थांवरील कारवाई थांबली होती. मात्र आता पुन्हा सहकार खात्याने गृहनिर्माण सहकारी संस्थांना लक्ष्य वेधून लेखापरीक्षण न केलेल्या १९६३ सालापासूनच्या शहरातील संस्थांची यादी जाहीर करीत त्यांना ११ मार्चपूर्वी म्हणणे मांडण्यासाठी लेखापरीक्षण न केल्यास नोंदणी रद्द करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरातील चार दशकांपासून वास्तव्य करणाऱ्या लाखो नाशिककरांना वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कारण या गृहनिर्माण सहकारी संस्थांची नोेंदणी रद्द झाल्यास या सहकारी सोसायट्यांचा वीज व पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे सहकार विभागाच्या या कारवाईमुळे नाशिककरांची नेमकी भूमिका काय, ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूच्या राजकीय पक्षांनी या गंभीर विषयावर अद्याप मौन पाळल्याची चर्चा नोेंदणी धोक्यात आलेल्या या १९७७ गृहनिर्माण सहकारी संस्थांमधील नागरिकांमध्ये आहे. (प्रतिनिधी)