नाशिक शहरातील वाहनतळाच्या शुल्कात दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 03:04 PM2018-01-11T15:04:13+5:302018-01-11T15:08:42+5:30

महासभेत प्रस्ताव मंजूर : स्मार्ट पार्कींगचे नियोजन

 Two times the increase in the cost of parking in Nashik city | नाशिक शहरातील वाहनतळाच्या शुल्कात दुपटीने वाढ

नाशिक शहरातील वाहनतळाच्या शुल्कात दुपटीने वाढ

Next
ठळक मुद्देस्मार्ट सिटी योजनेंतर्गत २८ ठिकाणी अद्ययावत आॅन स्ट्रीट आणि ५ ठिकाणी आॅफ स्ट्रीट पार्कींगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजनस्मार्ट सिटी योजनेंतर्गत वाहनतळ उभारणीचे काम पीपीपी तत्वावर १० वर्षे कालावधीकरीता करण्याचे प्रस्तावित

नाशिक - महापालिका हद्दीत स्मार्ट सिटी योजनेंतर्गत २८ ठिकाणी अद्ययावत आॅन स्ट्रीट आणि ५ ठिकाणी आॅफ स्ट्रीट पार्कींगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विविध कर विभागाने वाहनतळाच्या शुल्कात दुपटीने दरवाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सदर प्रस्तावाला बुधवारी (दि.१०) झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली.
शहरात गेल्या काही वर्षांपासून वाहनतळांची समस्या अतिशय गंभीर बनलेली आहे. वाहनतळांसाठी महापालिकेने नियोजित केलेल्या जागांवर संबंधित ठेकेदारांकडून मनमानी फी वसुली केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातून ब-याचदा वादविवादाचेही प्रसंग घडत असतात. याशिवाय, पार्कींगसाठी पुरेशा जागा नसल्याने वाहनधारकांकडून रस्त्यांवर वाहने लावून दिली जातात. त्यामुळे टोर्इंग ठेकेदाराकडून वाहने उचलण्याचे प्रकार घडत असल्याने त्याबाबतही नागरिकांत असंतोष आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत वाहनतळ उभारणीचे काम पीपीपी तत्वावर १० वर्षे कालावधीकरीता करण्याचे प्रस्तावित आहे. सदर वाहनतळांच्या ठिकाणी आॅटोमॅटिक सेन्सर सॉफ्टवेअर बुब बॅरल अद्ययावत सुविधेसह सुरू करण्यात येणार आहेत. २८ ठिकाणी आॅन स्ट्रीट पार्कींगसाठी जागा निश्चित करण्यात आलेल्या असून त्याठिकाणी सुमारे ४३७६ दुचाकी तर १६६२ चारचाकी वाहनांचे पार्कींग होणे अपेक्षित आहे. तसेच आॅफ स्ट्रीट पार्कींगच्या ठिकाणी २५५ दुचाकी तर ३७२ चारचाकी वाहनांचे पार्कींग होतील, असा अंदाज आहे. अद्ययावत वाहनतळाची उभारणी करतानात महापालिकेने वाहनतळ शुल्कात दरवाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला असून त्यात दुपटीने वाढ सुचविलेली आहे. त्यानुसार, सदरचा प्रस्ताव बुधवारी (दि.१०) झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला आहे. या नवीन दरवाढीमध्ये ट्रक व टेम्पोसाठी चार तासांकरीता २० रुपयांऐवजी ३० रुपये, चार तासांच्या पुढील १२ तासांपर्यंत ३० रूपये ऐवजी ४० रूपये तर बारा तास ते चोवीस तासापर्यंत ४० ऐवजी ६० रुपये करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
लागू करण्यात आलेली दरवाढ
वाहन तपशिल    सद्यस्थितीतील दर        नवीन दर (प्रतितास)
कार/जीप/टॅक्सी        १० रुपये                 २० रुपये
रिक्षा/तिचाकी वाहने   १० रुपये                 २० रुपये
दुचाकी वाहने              ०५ रुपये                १० रूपये
सायकल                     ०२ रुपये                ०५ रूपये
बस                             २० रूपये               ४० रुपये

Web Title:  Two times the increase in the cost of parking in Nashik city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.