बारवमधून काढला दोन टन कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:13 AM2017-09-16T00:13:54+5:302017-09-16T00:14:01+5:30
भगूर येथील पुरातन जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाºया श्री रेणुका माता देवी मंदिरासमोरील ‘बारव’ याची शिवशाही युवक मंडळाने स्वच्छता करून दोन टन केरकचरा, घाण व साहित्य जमा केले.
देवळाली कॅम्प : भगूर येथील पुरातन जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाºया श्री रेणुका माता देवी मंदिरासमोरील ‘बारव’ याची शिवशाही युवक मंडळाने स्वच्छता करून दोन टन केरकचरा, घाण व साहित्य जमा केले. पुरातन व जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या भगूरच्या श्री रेणुका माता देवी मंदिरात नवरात्रीमध्ये नाशिक, सिन्नर, इगतपुरी या तिन्ही तालुक्यांच्या इतर भागातील भाविक दर्शनासाठी येतात. मंदिरासमोर असलेले बारव हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्या बारवात हातपाय धुतल्यास, अंघोळ केल्यास त्वचेचे रोग व इतर आजार नाहीसे होतात अशी भाविकांची अनेक वर्षांपासून श्रद्धा आहे. मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून छावणी प्रशासनाच्या आरोग्य विभागाला बारव स्वच्छ करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र छावणी प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नवरात्रोत्सवात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन देवळाली कॅम्प येथील शिवशाही युवक मंडळाने स्वखर्चाने बारवाची स्वच्छता केली. बारवाचे पाणी स्वच्छ झाल्याने भाविकांनी अंघोळीसाठी गर्दी केली होती. स्वच्छतेसाठी शिवशाही युवक मंडळाचे चंद्रकांत कासार, धर्मेंद्र मल, वैभव पाळदे, सुरेश आव्हाड, ओल्वीन स्वामी, युवराज कासार, पप्पू काशीद, सिराज शेख, पवन कासार, अजय युवराडे, विशाल उगले, रोहित कासार आदिंनी सहभाग घेतला.
बारवामधून वाळू, नारळाच्या कवट्या, कपडे, निर्माल्य, प्लॅस्टिक, पाण्याच्या बाटल्या, दगडगोटे आदी असा एकूण दोन टन केरकचरा व घाण काढून बारव स्वच्छ करण्यात आला. तसेच बारवाच्या पाण्याला वास येत असल्याने कार्यकर्त्यांनी त्यामध्ये औषध टाकून स्वच्छता केली.