मंत्रिमंडळात दोन आदिवासी आमदारांचा समावेश; आदिवासी मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 18:03 IST2024-12-16T18:01:08+5:302024-12-16T18:03:19+5:30
झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातीलच आमदार असल्याने आणि त्यांनी आपण आदिवासी विभाग सांभाळण्यास इच्छुक असल्याचे यापूर्वीदेखील म्हटले होते.

मंत्रिमंडळात दोन आदिवासी आमदारांचा समावेश; आदिवासी मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
नाशिक : महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ आणि भाजपकडून अशोक उईके या दोन आदिवासी आमदारांनी शपथ घेतल्याने या दोन्हींपैकी आदिवासी विकास मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे समाजबांधवांचे आणि या नेत्यांच्या कार्यकर्त्याचेही लक्ष लागून आहे.
मागील मंत्रिमंडळात डॉ. विजयकुमार गावित यांच्या रूपाने भाजपकडे आदिवासी विकास मंत्र्यांची जबाबदारी होती, परंतु या निवडणुकीत गावित यांची मुलगी आणि दोन्ही भाऊ यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने गावित यांच्याविषयीची नाराजी होती. शपथविधी यादीत त्यांचे नाव नसल्याने आदिवासी विभागाला नवा चेहरा मिळणार असल्याचे निश्चित आहे. परंतु हे खाते भाजपकडेच जाणार की, राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.
आदिवासी आमदारांचे नेतृत्व आणि पेसा भरतीवरून मंत्रालयात आंदोलन केल्यामुळे झिरवळ यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी आदिवासी आमदारांकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. यासाठी त्यांनी लॉबिंगही केले अन् झिरवळ यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. राज्यातील आणखी एक आदिवासी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदारसंघाचे भाजपचे आ. अशोक उईके यांनीदेखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे साहजिकच आदिवासी विकासमंत्रिपद कुणाच्या वाट्याला येईल, याबाबतची चर्चा सुरू झाली. मागील मंत्रिमंडळात भाजपकडे आदिवासी विभाग होता. त्यामुळे यंदाही तो भाजप आपल्याकडेच ठेवण्याचा प्रयत्न करू शकते. याशिवाय झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातीलच आमदार असल्याने आणि त्यांनी आपण आदिवासी विभाग सांभाळण्यास इच्छुक असल्याचे यापूर्वीदेखील म्हटले होते. त्यामुळे या पदावर कुणाला संधी मिळणार यासाठी रस्सीखेच होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, मागील पंचवार्षिकमध्ये उईके यांच्याकडे चार महिन्यांसाठी आदिवासी विकास विभागाचा कार्यभार देण्यात आलेला होता. भाजपचे ते निष्ठावान आमदार म्हणून ओळखले जातात. ते २०१४, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकांमध्ये सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून २००४, २०१४ व २०१९, २०१४ या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये झिरवळ चार वेळा आमदार झाले आहेत. त्यामुळे निष्ठा आणि ज्येष्ठत्वाच्या मुद्यावरदेखील दोघांमध्ये चुरस असेल.