नाशिक जिल्ह्यासाठी दोन ‘ट्रुनॅट’ मशीन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:24 PM2020-06-16T23:24:38+5:302020-06-17T00:37:36+5:30
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहून शासनाकडून नाशिक जिल्ह्यासाठी दोन ट्रुनॅट मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील एक मशीन नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये, तर दुसरे मशीन मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे. बुधवारपासून या दोन्ही मशीनवर नमुन्यांची चाचणी करण्यात येणार असून, त्यामुळे जिल्ह्यातील अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होऊ शकणार आहे.

सध्या नाशिक शहरातील बाधितांच्या किंवा अन्य उपचारांसाठदेखील दाखल होणाऱ्या संशयितांच्या नमुन्यांची तपासणी पुण्याच्या प्रयोगशाळेत तर मालेगावच्या संशयितांची तपासणी धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड तपासणी केंद्रात केली जाते. मात्र, या दोन्ही ठिकाणी प्रचंड लोड आल्याने या दोन्ही ठिकाणी संशयितांचा अहवाल मिळण्यास दोन दिवसांचा वेळ लागत होता. एखादा संशयित बाधित आहे किंवा नाही, हे कळण्यास इतका विलंब लागत असल्याने रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक तेवढा काळ पूर्णपणे दबावाखाली असतात. म्हणजे एखाद्या संशयिताचा अहवाल निगेटिव्ह आला तरी दरम्यानचे दोन-तीन दिवस त्या व्यक्तीने आणि कुटुंबीयांनी प्रचंड तणावात घालविलेले असतात. त्यामुळे हा विलंब टळावा आणि सर्व संशयितांचा अहवाल एका दिवसातच मिळावा किंवा काही पर्यायी यंत्रणा उभी करावी या उद्देशाने शासनाच्या क्षयरोग नियंत्रण विभागाच्या वतीने हा ट्रुनॅट मशीनचा तोडगा काढण्यात आला आहे. नाशिक आणि मालेगाव शहराच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून हे ट्रुनॅट मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
-------------------
कोविड संशयित रुग्णाच्या इमर्जन्सी केसेस किंवा गर्भवती महिलांच्या तातडीच्या चाचणीसाठी ट्रुनॅट मशीन वरदान ठरणार आहे. या चाचणीला बुधवारपासून प्रारंभ होणार असून, दिवसाला किमान २४ ते २६ चाचण्यांचे अहवाल त्यातून मिळू शकतील. त्यामुळे अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाणदेखील घटण्यास मदत होणार आहे.
डॉ. कल्पना कुटे, आरोग्य अधिकारी , झाकीर हुसेन रुग्णालय