दोघा पोलीसपुत्रांसह पाच सराईत दोन वर्षांसाठी तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 07:12 PM2019-07-02T19:12:11+5:302019-07-02T19:14:41+5:30
कायदा सर्वांना समान आहे. कायदा सुव्यवस्था वारंवार बिघडविण्याचा प्रयत्न करणारा सराईत गुन्हेगार कोणाशीही संबंधित असला तरी त्याची गय केली जाणार नसल्याचे पोलीस प्रशासनाने दाखवून दिले आहे.
नाशिक : शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने सराईत गुन्हेगारांची चौकशी करून तीनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली जात आहे. परिमंडळ-१चे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दोन पोलीसपुत्रांसह पाच सराईत गुन्हेगारांना पुढील दोन वर्षांसाठी शहरासह जिल्ह्यातून सोमवारी (दि.१) तडीपार केले. आतापर्यंत एकूण १२५ गुन्हेगारांना जिल्ह्याच्या हद्दीबाहेर पाठविण्यात आले आहे.
कायदा सर्वांना समान आहे. कायदा सुव्यवस्था वारंवार बिघडविण्याचा प्रयत्न करणारा सराईत गुन्हेगार कोणाशीही संबंधित असला तरी त्याची गय केली जाणार नसल्याचे पोलीस प्रशासनाने दाखवून दिले आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशान्वये पाटील यांनी पोलीस मुख्यालयात राहणारे पोलीसपुत्र कृष्णा मधुकर जाधव (१९), हेमंत शांतीलाल परदेशी (२३) यांच्यासह राहुल रतन खैरे (२१, रा. दिंडोरीरोड), विकी ऊर्फटमाट्या श्यामलाल कुटे (२३, रा. मल्हारखाण झोपडपट्टी), फरहान ऊर्फदहशत कलीम शेख (२०, रा. चौकमंडई, जुने नाशिक), समीर मुनीर सय्यद (२२, रा. संत कबीरनगर झोपडपट्टी) आणि मुस्तकीम ऊर्फ मज्जा रहिम खान (२८, रा. वडाळानाका) या सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार परिमंडळ एकमधील गंगापूर, सरकारवाडा, पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, भद्रकाली, मुंबई नाका या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.
११ गुन्हेगार रडारवर
शहरातील परिमंडळ एकमधील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून आत्तापर्यंत १२५ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ११ सराईत गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांचाही तडीपारीचा प्रस्ताव तयार केला गेला असून, त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच एका टोळीवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील काही दिवसांमध्ये कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांकडून मिळाले आहे.