देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे दोन वॉर्ड महिलांसाठी राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:59 AM2019-12-22T00:59:27+5:302019-12-22T00:59:44+5:30
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी शनिवारी महिला आरक्षणाची सोडत काढण्यात येऊन वॉर्ड क्रमांक तीन व सात हे दोन्ही वॉर्ड महिला राखीव झाल्याने या वॉर्डातून निवडणुकीची तयारी करणाऱ्यांना पर्यायी वॉर्डाची चाचपणी करावी लागणार आहे.
देवळाली कॅम्प : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी शनिवारी महिला आरक्षणाची सोडत काढण्यात येऊन वॉर्ड क्रमांक तीन व सात हे दोन्ही वॉर्ड महिला राखीव झाल्याने या वॉर्डातून निवडणुकीची तयारी करणाऱ्यांना पर्यायी वॉर्डाची चाचपणी करावी लागणार आहे.
सकाळी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयाच्या प्रांगणात आरक्षण सोडतीचा ड्रॉ काढण्यात आला. आरक्षण सोडतीकरिता २,३,६,७ या वॉर्डाच्या नंबरच्या चिठ्ठी आरक्षण सोडत पात्रात टाकण्यात आल्या. महिला आरक्षण सोडतीकरिता इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. उपस्थित नागरिकांच्या समोर ब्रिगेडियर धनंजयन यांनी चार कागदांपैकी पहिल्यांदा काढलेला चिठ्ठीवर सात व नंतर तीन नंबर निघाल्याने हे दोन्ही वॉर्ड महिला राखीव झाल्याची घोषणा करण्यात आली. ब्रिगेडियर अरविंद धनंजयन यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार, कार्यालयीन अधीक्षक उमेश गोरवाडकर, सायमंड भंडारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. महिला आरक्षण सोडतीकरिता रतन चावला, सचिन ठाकरे, बाबूराव मोजाड, भगवान कटारिया, दिनकर पाळदे, दीपक बलकवडे, गुंडाप्पा देवकर, तानाजी करंजकर, तानाजी भोर, कावेरी कासार, आशा गोडसे, प्रभावती धिवरे, चंद्रकांत कासार, सुरेश कदम, विलास पवार, संजय गोडसे, संतोष कटारे, नितीन गायकवाड, सुशील चव्हाण, प्रवीण पाळदे आदी उपस्थित होते.
वॉर्ड क्रमांक सातमध्ये नगरसेवक बाबूराव मोजाड हे राष्ट्रवादी भाजप असा प्रवास करत सलग पाच पंचवार्षिक निवडणुकीत तीस वर्षे या वॉर्डाचे प्रतिनिधित्व करत होते, पण महिला आरक्षण सोडतीमुळे त्या वॉर्र्डातून यंदा त्यांच्या घरातून महिला उमेदवारी करू शकतात. यासह सीमा मोजाड, राधिका पाळदे, सरिता देवकर, नयना देवकर, रत्ना चौधरी, अर्पिता डांगे आदी इच्छुक आहेत, तर बाबूराव मोजाड हे वॉर्ड क्रमांक सहा किंवा चारमध्ये उमेदवारी करू शकतात.
पूजा विधीचा फायदा कोणाला?
मागील पंचवार्षिक निवडणूक पूर्व आरक्षण सोडतीच्या वेळेस काही आक्षेपार्ह वस्तू सापडल्याची चर्चा होत होती. शनिवारीदेखील आरक्षण सोडत ज्या जागेवर होणार होती त्या जागेवर दोन इच्छुकांनी वेगवेगळ्या वेळेत पूजा केली, तर साफसफाई करणाºया कर्मचाऱ्यांना लिंबू व अंडे सापडल्याचीच चर्चा आरक्षण सोडतीच्या वेळेस होत होती.
राजकारणाला कलाटणी
मागील पंचवार्षिक निवडणूक पहिल्यांदाच पक्षांच्या चिन्हावरच झाल्या होत्या यंदा मात्र पूर्वीप्रमाणे पक्षाऐवजी पुन्हा पॅनलची निर्मिती निवडणुकीत होऊ शकते. महाविकास आघाडी या निवडणुकीसाठी काय निर्णय घेतात याप्रमाणे पक्ष का पॅनल असा सोयीस्कर मार्ग अवलंबला जाण्याची शक्यता आहे.
वॉर्ड क्रमांक तीनमध्ये विद्यमान नगरसेवक उपाध्यक्ष भगवान कटारिया हे मागील पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्यांदा उमेदवारी करत भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला होता. आगामी निवडणुकीत त्यांची पत्नी अंकिता कटारिया उभ्या राहू शकतात. माजी उपाध्यक्षा सुनंदा कदम, सिमरन चावला, सोनाली गायकवाड, यास्मीन नाथानी या उमेदवारी करू शकतात.