उमराणेच्या दोन वॉर्डात रंगणार दुरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:44 AM2021-01-08T04:44:45+5:302021-01-08T04:44:45+5:30
उमराणे : जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चा रंगलेल्या देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध ...
उमराणे : जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चा रंगलेल्या देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध न होता दोन जागांसाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात वाॅर्ड क्रमांक १ मधून भरत काशिनाथ देवरे व ललित भाऊसाहेब देवरे, तर वाॅर्ड क्रमांक ४ मधून भूषण जमधाडे व बापू जमधाडे यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांचा प्रचाराचा शुभारंभ झाला आहे.१७ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत १५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. दरम्यान ग्रामसभेतील लिलाव आणि ग्रामपंचायत निवडणुकीचा कोणताही संबंध नसून गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या रामेश्वर मंदिराचे काम पूर्ण करण्यासाठी २८ डिसेंबरच्या ग्रामसभेत बोली लागली होती, असा दावा उमराणे ग्रामस्थांनी केला असून तसे पत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत विश्वासराव देवरे यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे.
दर वर्षाच्या शेवटच्या सोमवारी गावात ग्रामसभा होत असते ही गावची परंपरा असून गेल्या अनेक वर्षांपासून ती अखंडितपणे सुरु आहे. यावर्षीही २८ डिसेंबर रोजी ग्रामसभा घेण्यात आली. गावातील रामेश्वर मंदिराचे रखडलेले जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा सुरु होती. गावकऱ्यांनी जीर्णोद्धारासाठी वर्गणी जाहीर केलेली आहे. त्याची रक्कम तीन कोटी ६६ लाख रुपये इतकी होते. प्रत्यक्षात मात्र कमिटीकडे केवळ ३५ लाख रुपये जमा झालेले असल्याने उर्वरित रक्कम गोळा करुन देण्याबाबतची चर्चा सुरु असताना सुनील देवरे यांनी २.०५ कोटी रुपये जमा करुन देण्याची हमी घेतली आहे. याचा ग्रामपंचायत निवडणुकीशी कोणताही संबंध नाही असे प्रांतांना दिलेल्या पत्रात देवरे यांनी म्हटले आहे.
अद्याप सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. ग्रामपंचायत निवडणुकीचा लिलाव करण्याचा प्रश्नच येत नाही. सुमारे २५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत करण्यासाठी इतक्या मोठ्या रकमेची बोली लागूच शकत नसल्याचे प्रशांत देवरे यांनी सांगितले.
कोट -
दरवर्षी गावाची वार्षिक बैठक होत असते. यावर्षी योगायोगाने या काळात ग्रामपंचायत निवडणूक आल्याने हा सर्व घोळ झाला आहे. रामेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम आणि निवडणूक हे दोन स्वतंत्र विषय असून त्या बैठकीतील विषयाचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही.
- प्रशांत देवरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य , उमराणे