मतदानाला उरले दोन आठवडे; नाशिक ग्रामीण पोलीसांकडून ५ पिस्तूल, १५ तलवारी अन् ८ कोयते जप्त
By अझहर शेख | Published: May 8, 2024 02:16 PM2024-05-08T14:16:26+5:302024-05-08T14:16:45+5:30
नाशिक पोलिस अधिक्षक कार्यालयांतर्गत सुमारे ४० पोलिस ठाणे आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ग्रामीण पोलिस दलावर आहे.
अझहर शेख, नाशिक : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, मतदानाचा पाचवा टप्पा दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यात निवडणूक व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी ग्रामीण पोलिसांकडून कारवाईला वेग देण्यात आला आहे. पोलिसांनी अवैधरीत्या शस्त्रे बाळगणाऱ्या २१ जणांवर गुन्हे दाखल करत ५ गावठी पिस्तूल, १५ तलवारी, ८ कोयते, चॉपर, फायटरसारखे हत्यारे जप्त केली आहेत.
नाशिक पोलिस अधिक्षक कार्यालयांतर्गत सुमारे ४० पोलिस ठाणे आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ग्रामीण पोलिस दलावर आहे. पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सर्व अपर अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक यांच्या बैठका घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने कारवाईचे आदेश दिले आहेत. ग्रामीण पोलिस दलाकडून आतापर्यंत जिल्ह्यातून ३२ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, ५० गुन्हेगार आता रडारवर आहेत. तसेच एमपीडीएअंतर्गत चार गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यांचीही पडताळणी सुरू आहे.
गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन असलेल्या संशयित व्यक्तींवर सीआरपीसीच्या विविध कलमान्वये एकूण ३,३०० इसमांंविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलिसांच्या अभिलेखावर असलेल्या विविध गुन्ह्यांत पोलिसांना हवे असलेल्या एकूण ५७ गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तसेच शस्त्र परवाना असलेल्या परवानाधारकांकडून ७५१ अग्निशस्त्रे पोलिसांनी ‘कस्टडी’मध्ये घेतली आहेत.
वॉरंट बजावणी-१,६६५
दारूबंदी केसेस-११२६
जप्त दारू-८७,४४० लिटर
अवैध गुटखा केसेस- ७८
मुद्देमाल किंमत - ३,५३,५२,२६२ रुपये
८५४८ बेशिस्त वाहनचालकांना ‘दणका’
ग्रामीण भागात वाहतूक नियमांचा भंग करत बेशिस्तपणे वाहने चालविणाऱ्या ८५४८ वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. या अंतर्गत सुमारे ७५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, बेदरकारपणे वाहने दामटविणाऱ्यांसह मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांना पोलिसांनी ‘दणका’ दिला आहे. तसेच अवैध वाहतुकीचे १२१ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.