कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:13 AM2021-04-12T04:13:03+5:302021-04-12T04:13:03+5:30
शुक्रवारी (दि. ९) दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी आहिलाजी हिरे हे त्यांच्या दुचाकीने (एमएच १५ एचएल ४७१७) विल्होळीकडून पाथर्डी फाट्याच्या ...
शुक्रवारी (दि. ९) दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी आहिलाजी हिरे हे त्यांच्या दुचाकीने (एमएच १५ एचएल ४७१७) विल्होळीकडून पाथर्डी फाट्याच्या दिशेने जात होते. यावेळी गौळाने फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीला भरधाव कार (एमएच ४७ ए.यू ३१४९) ने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे फिर्यादी हिरेंसह हेमंत नेहते (रा. शिवशक्ती चौक) हे जखमी झाले.
----------
विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू
नाशिक : विषारी औषध सेवन केल्याने बेशुद्ध होऊन एकाचा मृत्यू झाला. जनककुमार भंडारी (५५, रा. सावरकरनगर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवार (दि. ४) रोजी भंडारी यांनी काहीतरी विषारी औषध घेतले. त्यामुळे ते बेशुद्ध झाल्याने उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
--------------
चक्कर येऊन पडल्याने चौघे मृत्युमुखी
नाशिक : अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने एकाच दिवशी शहरात तिघा वृद्धांसह एका तरुणाचा मृत्यू झाला. चक्कर येण्याचे नेमके कारण समजू शकले नसून याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पहिली घटना कलानगर, इंदिरानगर परिसरात घडली. येथील यशवंत दत्तात्रय कुलकर्णी (७८) हे शनिवारी (दि. १०) दुपारी तीनच्या सुमारास राहत्या घरी अचानक चक्कर येऊ पडले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.
दुसऱ्या घटनेत देवळाली कॅम्प परिसरात इद्रीस इसाक कुलाबावाला (७०, रा. देवळाली कॅम्प) यांचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. १०) सायंकाळच्या सुमारास कुलाबावाला हे दुचाकीने घरी जात असताना अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले. त्यात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते मृत्युमुखी पडले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तिसऱ्या घटनेत सातपूर येथील राजू जेठालाल राठोड (५६, रा. श्रमिकनगर) हे शनिवारी कार्बन नाका येथून पायी जात असताना अचानक चक्कर येऊन पडले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.
चौथ्या घटनेत रोकडोबावाडी येथील आकाश निकाळजे (२७) या तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी राहत्या घरी अचानक चक्कर येऊन आकाश बेशुद्ध पडला. त्यामुळे उपचारासाठी त्याला बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.