वडगाव शिवारात दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:11 AM2020-12-23T04:11:30+5:302020-12-23T04:11:30+5:30

----- विनापरवानगी वाळू उपसा, चौघा जणांविरुद्ध गुन्हा मालेगाव : तालुक्यातील गाळणे शिवारातील अमरावती धरणामधून जेसीबी ट्रॅक्टरच्या साहाय्याने विनापरवानगी वाळू ...

Two-wheeler lampas in Wadgaon Shivara | वडगाव शिवारात दुचाकी लंपास

वडगाव शिवारात दुचाकी लंपास

Next

-----

विनापरवानगी वाळू उपसा, चौघा जणांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : तालुक्यातील गाळणे शिवारातील अमरावती धरणामधून जेसीबी ट्रॅक्टरच्या साहाय्याने विनापरवानगी वाळू उपसा करणाऱ्या चौघा जणांविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्र्यंबक दगडू कर्नर यांनी फिर्याद दिली. नामदेव जगन्नाथ शेंडे, उमेश बन्सीलाल चौधरी, विश्वनाथ जगन्नाथ शिंदे, खुशाल अशोक भिसे, (सर्व, रा. गाळणे) हे विनाक्रमांकाचे जेसीबी व ट्रॅक्टर (क्र. एमएच ४१ एएस ८९७८ व एमएच १८ झेड ९०२५) व विनाक्रमांकाच्या ट्रॉलीद्वारे वाळू उपसा करताना आढळून आले. कर्नर यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता खुशाल याने दमदाटी व शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.

-----

निळगव्हाण शिवारातून तीन दुचाकी लंपास

मालेगाव : शहरालगतच्या निळगव्हाण शिवारातून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी शरद बाजीराव बच्छाव यांनी वडनेर खाकुर्डी पोलिसांत फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र. एमएच १९ एजे २०६३) व २५ हजार रुपये किमतीची (क्र. एमएच ४१ एपी ७८२५) व २० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र. एमएच ४१ एके २३९५) चोरून नेल्या. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

-----

मनपात नगर पथविक्रेता आत्मनिर्भर दिन उत्साहात

मालेगाव : महापालिकेत केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर पथविक्रेता दिन साजरा करण्यात आला. शहरातील आठ बॅंक शाखांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. २०५ पथविक्रेत्यांना १० हजार रुपये खेळते भांडवल म्हणून कर्ज वितरित करण्यात आले. कार्यक्रमास समन्वय अधिकारी संदीप वाघ, बॅंक शाखा अधिकारी पांडे, कल्पना सोनपसारे, नितीन महाजन, समुदाय संघटक व पथविक्रेते उपस्थित होते.

-----

पाणीपुरवठा योजनेस गळती

मालेगाव : दहिवाळसह २६ गाव पाणीपुरवठा योजनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून, दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. या जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

----

मालेगाव ग्रामीण भागात अवैध मद्य विक्री

मालेगाव : तालुक्यातील अनेक गावांमध्ये देशी, विदेशी मद्य विक्री केली जात आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकाची धामधूम सुरू आहे. यामुळे अवैध मद्याची विक्री वाढली आहे. ग्रामीण पोलिसांनी गावठी अड्ड्यांसह देशी, विदेशी मद्य विक्रीेचे केंद्र उद‌्ध्वस्त करावे, अशी मागणी होत आहे.

-----

मांजा विक्रीवर बंदी आणण्याची मागणी

मालेगाव : शहर परिसरातील दुकानदारांकडून मांजाची विक्री केली जात आहे. या मांजात अडकून अनेक पक्षी जखमी होत आहेत. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी मांजावर कायमस्वरूपी बंदी घालावी तसेच मांजा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.

-----

श्री गुरुदत्त मंदिरात जन्मोत्सव सप्ताह

मालेगाव : येथील कॅम्प भागातील श्री गुरुदेव दत्तमंदिरात मंगळवारपासून श्री गुरुदेव दत्त जन्मोत्सव सप्ताहाला सुरुवात झाली आहे. येत्या ३० डिसेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मंगळवारी सकाळी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झाली. बुधवारी मंगल शोभा पालखी काढण्यात येणार आहे. दुपारी जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.

------

राष्ट्र सेवा दलातर्फे दल सप्ताह

मालेगाव : येथील राष्ट्र सेवा दलातर्फे दल सप्ताह नियोजन बैठक कर्मवीर या. ना. जाधव विद्यालयात पार पडली. अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष सुधीर साळुंके होते. राष्ट्र सेवा दलातर्फे २४ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान दल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.

----

कीर्तन, प्रवचनाला परवानगी

मालेगाव : नियमांचे पालन करून १०० श्रोत्यांच्या उपस्थितीत कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमास राज्य शासनाने परवानगी दिल्याने वारकरी सांप्रदायाच्या वतीने समाधान व्यक्त केले जात आहे. राज्य शासनाने कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.

Web Title: Two-wheeler lampas in Wadgaon Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.