मतदार जागृतीसाठी दुचाकी रॅली
By admin | Published: February 20, 2017 12:21 AM2017-02-20T00:21:45+5:302017-02-20T00:22:20+5:30
ंमनपा निवडणूक : विविध संस्थांचा सहभाग
नाशिक : महापालिका निवडणुकीत मतांचा टक्का वाढविण्यासाठी आयोजित ‘होय, मी मतदान करणारच’ या उपक्रमांतर्गत महापालिकेसह विविध संस्था - संघटनांच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात आली. महापालिका निवडणुकीत सन २००७ मध्ये मतदानाची टक्केवारी ६० टक्के होती, तर ती २०१२च्या निवडणुकीत तीन टक्क्यांनी घटून ५७ टक्के झाली. यंदा मतांचा टक्का वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विशेष अभियान हाती घेतले आहेत. त्याअंतर्गत मतदार जागृती केली जात आहे. राज्यात नाशिकने मतदानाच्या टक्केवारीत विक्रम प्रस्थापित करावा यासाठी मतदार जागृती करण्यासाठी विविध संस्था-संघटनांच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यात नाशिक महापालिका, कविता राऊत फाउंडेशन, नाशिक सिटिझन्स फोरम, नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (निमा), अंबड इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आयमा), नाशिक येझदी जावा क्लब आणि क्रुझिंग गोंडस् या संस्थांचा सहभाग होता. सकाळी १० वाजता महात्मानगर मैदानापासून दुचाकी रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. भोसला मिलिटरीजवळील लोकमत सर्कल, कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर, शरणपूररोड, राजीव गांधी भवन, जुने सीबीएस, जिल्हा न्यायालय, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, रेडक्रॉस, शालिमार, सारडा सर्कल, गडकरी चौक, चांडक सर्कल, मायको सर्कल, एबीबी सर्कल या मार्गे रॅली नेऊन परत महात्मानगर मैदानावर समारोप झाला. ‘होय, मी मतदान करणारच’ असे फलक हाती घेऊन निघालेली ही दुचाकी रॅली लक्षवेधी ठरली. यावेळी मतदार जागृतीसाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या संदेशदूत आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत या सहभागी झाल्या होत्या. तसेच नाशिक सिटिझन्स फोरमचे अध्यक्ष सुनील भायभंग, जितेंद्र ठक्कर, विजय संकलेचा, संदीप जाधव, नितीन उपासनी, महेश तुंगार, मकरंद उदावंत, अंबरीश मोरे आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)