स्त्री रुग्णालयावरून भाजपा नगरसेवकांत पडले दोन गट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:00 AM2017-11-04T01:00:41+5:302017-11-04T01:02:14+5:30
शासन अनुदानातून उभारण्यात येणाºया शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयावरून भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांच्यात थेट संघर्ष उभा राहिला असतानाच या रुग्णालयावरून महापालिकेतील सत्ताधारी भाजपातही दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गिते-फरांदे समर्थक नगरसेवकांमध्येच जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक : शासन अनुदानातून उभारण्यात येणाºया शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयावरून भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांच्यात थेट संघर्ष उभा राहिला असतानाच या रुग्णालयावरून महापालिकेतील सत्ताधारी भाजपातही दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गिते-फरांदे समर्थक नगरसेवकांमध्येच जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शासन अनुदानातून भाभानगर येथे शंभर खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्यास महासभेने मान्यता दिलेली आहे. सदर रुग्णालयावरून आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली असतानाच दोघांच्या समर्थक नगरसेवकांकडूनही आता थेट समर्थन केले जात आहे. सर्वप्रथम आयुक्तांनी भाभानगरच्या जागेचा प्रस्ताव महासभेवर मंजुरीसाठी ठेवला होता, त्यावेळी अर्चना थोरात यांनी सदरचा प्रस्ताव तहकूब ठेवण्याची मागणी करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उपमहापौर प्रथमेश गिते यांनी आयुक्तांच्या प्रस्तावाला उपसूचना देऊन टाकळीरोड येथील पर्यायी जागेची सूचना केली होती. परंतु या प्रस्तावाला विरोध करत फरांदे समर्थक मानल्या जाणाºया सुप्रिया खोडे यांनी आपला प्रभाग नसताना भाभानगरची जागाच स्त्री रुग्णालयासाठी देण्याची मागणी केली. या साºया घटना-घडामोडींनंतर मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या आदेशान्वये भाभानगरच्या जागेचा मूळ आयुक्तांचा प्रस्ताव मान्य करून तसा ठराव पाठविण्यात आला. त्यामुळे गिते समर्थक खवळले असून, भाभानगरला रुग्णालय होऊ न देण्याचा निर्धार केला आहे. आता गिते-फरांदे यांचे समर्थक रुग्णालयासाठी पुढे येऊ लागले आहेत. भाजपाचे सिडकोतील नगरसेवक व गिते समर्थक मानले जाणारे मुकेश शहाणे यांनी आयुक्तांना पत्र देऊन सदर शंभर खाटांचे रुग्णालय सिडकोतील पेलिकन पार्कच्या जागेत उभारण्याची मागणी केली आहे. या रुग्णालयावरून भाजपा नगरसेवकांतही दोन गट पडत चालल्याचे दिसून येत आहे.