दोन वर्षे उलटूनही पैसे दिले नाही; कोरोना काळात मदत करणाऱ्या ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2022 12:21 PM2022-08-15T12:21:25+5:302022-08-15T12:22:54+5:30
कोरोना काळात सुविधा पुरवण्याचे काम नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिले होते.
मालेगाव (नाशिक)-- कोरोना काळात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी मंडप ,लाईट, पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे, भोजनव्यवस्था व इतर सुविधा पुरवण्यासाठी ठेका देण्यात आला होता मात्र दोन वर्षे उलटूनही संबंधितांना त्यांचे देयके मिळत नसल्यामुळे ठेकेदार सुनील मोरे यांनी ध्वजारोहण पूर्वी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. कॅम्प पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
कोरोना काळात सुविधा पुरवण्याचे काम नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिले होते. त्यानुसार सुविधा पुरविण्यात आल्या होत्या त्यापोटी ९३ लाख ९५ हजार ४७ रुपये एवढे देयक झाले आहे .याबाबत संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही. जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांनी देखील खर्च भागवण्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य शासनानेही हा खर्च जिल्हा नियोजन समिती व अन्य मार्गाने उपलब्ध करून द्यावा अशा सूचना विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत तरीदेखील बिल दिले जात नाही.
वाहने भाडे तत्त्वावर देण्यासाठी १३ लाख ५९ हजार ३६४ रुपये, तात्पुरती सीसीटीव्ही यंत्रणा भाडेतत्वावर लावण्यासाठी १२ लाख ६३ हजार पाचशे रुपये, मंडप,साउंड सिस्टम, पिण्याचे पाणी यासाठी १८ लाख १४ हजार ९४९ रुपये, मंगल कार्यालयाचे विजेची देयके अदा करण्यासाठी २१ लाख २३ हजार २३५ रुपये, पोलिस बंदोबस्तासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांची जेवणासाठी २५ लाख ८७ हजार रुपये असा एकूण ९३ लाख ९५ हजार ५४७ रुपये बिल झाले आहे. देयके देण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळूनही बिले दिले जात नसल्यामुळे ठेकेदार सुनील मोरे यांनी पोलीस कवायत मैदावरील मुख्य ध्वजारोहण प्रसंगी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला . पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे आत्मदहन रोखण्यात आले. मोरे यांच्यावर कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.