महिलेचा विनयभंग करणाऱ्यास दोन वर्षाची सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:27 AM2021-03-13T04:27:21+5:302021-03-13T04:27:21+5:30
नाशिक : सातपूरच्या श्रमिकनगर भागात आयटीआय कॉलनीतील साई रो हाऊस परिसरात चार वर्षांपूर्वी महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा ...
नाशिक : सातपूरच्या श्रमिकनगर भागात आयटीआय कॉलनीतील साई रो हाऊस परिसरात चार वर्षांपूर्वी महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश हेमंत जोशी यांनी दोन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. लक्ष्मण मनीराम देवरे (वय ४३, रा. मयूर पार्क, शिव कॉलनी, सातपूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना ३ ऑगस्ट २०१७ मध्ये घडली होती. देवरे याने पीडित महिलेस तिच्या घराजवळील रस्त्यावर अडवून अश्लील भाषेत संभाषण करून तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी पीडितेने सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून देवरे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक एस. ए. जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करून सबळ पुरावे गोळा करीत न्यायालयात सादर केले. उपलब्ध सबळ पुराव्यांवरून जिल्हा व सत्र न्यायालयात दोष सिद्ध झाल्याने आरोपी देवरे यास दोन वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून ॲड. सुषमा बंगले यांनी पीडित महिलेच्या बाजूने युक्तिवाद करीत महिलेची बाजू मांडली.