दारणा नदीपात्रात दोन तरुण बुडाले; अग्निशमन दल, पोलिसांकडून बचावकार्य सुरू
By नामदेव भोर | Published: June 11, 2023 03:57 PM2023-06-11T15:57:34+5:302023-06-11T15:58:31+5:30
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे व अग्नीशमनदलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून शनिवारी सायंकाळपासून या भागात मदत कार्य सुरू आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : दारणा नदीपात्रात दोन तरुण बुडाल्याची घटना घडली असून या तरुणांचा अग्नीशमन दलाचे जवान आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यातील पथकांकडून जीवरक्षकांच्या मदतीने शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेहडी पंपींग बंधाऱ्याजवळ शनिवारी (दि.१०) दुपारी दोन वाजेच्या सुरारास सिन्नरफाटा येथील सिद्धार्थ संकेत गांगुर्डे (१७), राहूल दिपक महानुभाव (१८), संतोष नामदेव मुकणे, व आर्यन नंदू जगताप हे चौघे तरुण पोहण्यासाठी गेले होते. यातील दोन तरुण पाण्याच्या उलट्या प्रवाहात अडल्याने त्यांनी मदतीसाठी आवाज दिला. मात्र त्यांचा प्रवाहातून बाहेर पडेपर्यंत दम संपल्याने ते दोघे बुडाल्याचे त्यांच्या साथिदारांनी पोलिसांना सांगितले. पाण्यात बुडालेल्या तरुणांमध्ये सिद्धार्थ संकेत गांगुर्डे (१७), राहूल दिपक महानुभाव (१८) या दोघांचा समावेश असल्याचे संतोष नामदेव मुकणे याने पोलिसांना सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली, मात्र पोलिसांनी अद्याप कोणत्याही माहितीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे व अग्नीशमनदलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून शनिवारी सायंकाळपासून या भागात मदत कार्य सुरू आहे, परंतु, दारणा धरणातून आवर्तन सुरू असल्याने वाहत्या पाण्याच्या प्रवाहात रविवारी सायंकाळपर्यंत बचावकार्य करणाऱ्या पथकाच्या हाताला काहीच लागलेला नाही. त्यामुळे उशीरापर्यंत बचावकार्य सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.